ठाणे : ठाण्यातील कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयात मराठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या शाळेत आता मराठीचे धडे विद्यार्थी गिरविणार आहेत. या संदर्भात मनसेकडून पाठपुरावा सुरु होता, त्यास यश आल्यानंतर राज्यातील केंद्रीय विद्यालयाच्या ६९ शाळांमध्ये ठाणे पॅटर्न राबविण्याची मागणी मनसेने केली आहे.
ठाण्यातील कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयात १४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांमध्ये शिक्षण दिले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेत मराठी शिकवली जात नव्हती. याबाबत मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या शाळेत मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, २६ जून २०२५ रोजी केंद्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात मराठी शिकवण्यास सहमती दर्शवली आहे. ‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार मराठी भाषा ही स्थानिक भाषा म्हणून शिकवणे आवश्यक असून, आमच्या शाळेत सुद्धा याची अंमलबजावणी होईल असे मुख्याध्यापकांनी लेखी कळवले आहे.
मराठी ही राज्याची अभिजात दर्जा प्राप्त भाषा असून तिचा अवमान केल्यास भविष्यात मराठी संस्कृती आणि भाषेबाबतची जाण कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. महाराष्ट्रातील ६९ केंद्रीय विद्यालयांत ८५ हजार ४९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी अनेक शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत होता. दरम्यान सध्या राज्यात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राज्य सरकारने राज्यात हिंदी सक्ती नसून मराठी सक्ती असल्याचे आदेश दिले असले तरी आजही अनेक शाळांमध्ये मराठी शिकविली जात नाही हे वास्तव आहे.
त्यामुळे ठाणे पॅटर्न राज्यातील इतर केंद्रीय विद्यालयात राबविला जावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर भाषेची जपणूक आणि विद्यार्थ्यांचा समविकास होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही अद्याप अनेक शाळांमध्ये तिच्या अध्यापनाबाबत दुर्लक्ष होत होते. मात्र मनसेच्या वेळेवर झालेल्या हस्तक्षेपामुळे ठाण्यातून सुरुवात झाली असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रीय शाळांमध्ये मराठी शिकवली जावी, अशी मागणी केली जात आहे.
शाळेत मराठी भाषा शिकवली जात नाही अशी तक्रार पालकांनी मनविसे कडे केल्यानंतर ठाण्यातील केंद्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेटून मराठी विषय शिकवणे बंधनकारक असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर आता शाळा मराठी विषय पहिली पासून शिकवणार आहे. मुख्यमंत्री सांगतात तशी मराठीची सक्ती सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये अंमलात आलेली नाही. महाराष्ट्रातील ६९ केंद्रीय विद्यालयांच्या शाळांमध्ये ८५४९७ मुले मराठी शिकत नाहीत त्यांना देखील मराठी शिकवले गेलेच पाहिजे. – संदीप पाचंगे, सरचिटणीस मनसे