ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गात अडसर ठरत असलेली शीळ परिसरातील तळ अधिक एक मजली बेकायदा इमारतीवर ठाणे महापालिकेने सोमवारी पोलिस बंदोबस्तात हातोडा मारला. या कारवाईला सुरूवातीला विरोध झाला आणि यादरम्यान पालिका तसेच पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पालिकेने विरोध मोडीत काढत इमारतीचे बांधकाम पाडले. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प ओळखला जातो.

ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील जागा बाधित होणार आहे. त्यास पालिकेने यापुर्वीच हिरवा कंदील दाखविला आहे. या प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर करण्याचे काम शासकीय यंत्रणांमार्फत गेल्या काही वर्षांपासून सुरू असतानाच, या प्रकल्पाच्या मार्गावर शीळ येथे बेकायदा इमारत उभारण्यात येत असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली. या इमारतीचे तळ अधिक एक मजली बांधकाम झाले होते. ६० × २५ मीटर क्षेत्रावर हे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामावर सोमवारी सकाळी ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी आणि महसुल विभागाच्या मंडळ अधिकारी सपना चौरे, नितीन पिंगळे (तलाठी) आणि मुब्रा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईला सुरूवातीला विरोध झाला. त्यानंतर विरोध मोडीत काढत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, पालिका अधिकारी जोशी आणि पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

बुलेट ट्रेनच्या मार्गावरील शीळ परिसरात तळ अधिक एक मजली बेकायदा इमारत उभारण्यात आली होती. त्यावर आणखी एक मजला उभारणीचे काम सुरू होते. या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून येथील सदनिकांमध्ये काही नागरिकांनी ठाण मांडले होते. या इमारतीत ते वास्तव्य करीत असल्याचे चित्र उभे करण्यात आले होते, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईला सुरूवातीला विरोध झाला आणि त्या दरम्यान धक्काबुक्कीही झाली. परंतु विरोध मोडीत काढत पोलिस बंदोबस्तात इमारतीवर कारवाई करण्यात येत आहे.- मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका