मुंबईमध्ये १० फेब्रुवारी ते ३० मार्च या ४८ दिवसांत एकूण ८५ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा करोना झपाट्याने वाढतोय. राज्यातील इतर भागांमध्येही करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. १५ एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ नये, करोना संसर्गावर नियंत्रण ठेवता यावं म्हणून त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे नागरिकांना प्रशासनापासून ते नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सांगत आहे. तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मात्र आता अशा बेजबाबदार नागरिकांना धडा शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी चक्क त्यांना शाळेमध्ये देतात त्याप्रमाणे शिक्षा देण्यास सुरुवात केलीय. अर्थात सगळीकडे अशी शिक्षा केली जात नाही मात्र काही ठिकाणी बेशिस्त नागरिकांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी शिक्षा करण्याची वेगळीच कल्पना राबवलीय. उद्योजक आनंद महिंद्रांनी असाच व्हायरल एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आहे.

आनंद महिंद्रा हे अनेकदा सोशल नेटवर्किंगवरुन व्हायरल आणि मजेदार व्हिडीओ शेअर करुन त्यावर व्यक्त होत असतात. त्यांनी नुकताच मुंबईतील असाच एक व्हिडीओ शेअर केलाय. “मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे तोंडावर मास्क घालण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे कोंबडा बनवून चालवत शिक्षा केली. मला हा व्हिडीओ सिग्नल अॅपवर मिळाला. मी बोर्डींग स्कुलमध्ये होतो तेव्हा अशी शिक्षा ही सामान्य गोष्ट होती. थोडी मजेदार पण हे असं चालताना खूप थकायला व्हायचं. हे पाहून मी कधीच माझं मास्क विसरणार नाही,” असं आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ ट्विट करताना म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईच्या मरिन ड्राइव्हर काहीजणांना पोलिसांनी बेडुक उड्यांप्रमाणे चालण्यास सांगितल्याची शिक्षा केल्याचं आणि त्यांच्यावर एक पोलीस हवालदार लक्ष ठेवत असल्याचं दिसत आहे. मास्क न घालणाऱ्यांना भर उन्हात ही शिक्षा करण्यात आलीय.

आनंद महिंद्रांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.