Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेन म्हटलं की, तुफान गर्दी, धक्काबुक्की, सीटवरून सुरू असलेली हाणामारी, शिवीगाळ, भांडणं अशा सर्व गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण, तरीही लाखो मुंबईकर या लोकल ट्रेनवर अवलंबून आहेत. सर्व गोष्टींचा सामना करीत, ते रोज या लोकल ट्रेनने प्रवास करतात. पण याव्यतिरिक्त अनेकांसाठी लोकल ट्रेन म्हणजे रील्स शूटिंगसाठी एक सोईची जागा बनली आहे. जो येतो तो फेमस होण्यासाठी ट्रेनमध्ये व्हिडीओ शूट करताना दिसतोय. सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील अशाच एक रीलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक महिला रीलसाठी धोकादायक पद्धतीने धावत्या ट्रेनच्या दरवाजाबाहेर लटकताना दिसतेय. इतकंच नाही, तर ती गर्दीतून वाट काढत डान्स करत आपल्या सीटपर्यंत पोहोचते.

आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की, लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभं राहून स्टंटबाजी करताना किंवा व्हिडीओ शूटिंग करताना अनेकांनी आपला जीव गमावल आहे. मात्र, त्यानंतरही हे चुकीचे प्रकार करणं थांबवण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही रीलसाठी एक महिला स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसतेय. इतकंच नाही, तर तिच्या रीलच्या हौसेसाठी ती इतर प्रवाशांनाही उगीच त्रास देतेय.

महिलेचा रिलसाठी इतर प्रवाशांनाही उगीच त्रास

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी आहे; पण त्या गर्दीतही एका महिलेला रील शूट करण्याचा मोह काही आवरता आला नाही. तिनं चक्क लोकलच्या डब्याच्या दरवाजावरील खांबाला लटकून रील व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. ट्रेन इतक्या वेगामध्ये धावतेय तरीही ती जीवाची पर्वा न करता, दरवाजावर लटकून रील व्हिडीओ बनवतेय. महिलेच्या या थिल्लरपणामुळे इतर महिलांना मात्र उगीच त्रास सहन करावा लागतोय. इतकंच नाही, तर रीलसाठी ती नाचत-बागडत महिलांच्या गर्दीत शिरते आणि पुढे येऊन, ती चौथ्या सीटवर एका काकींनी ठेवलेली बॅग खाली फेकून देते. त्यानंतर त्यांच्या अंगावर वजन टाकून नाचू लागते. पुन्हा नाचत सीटवरून उठते आणि मधल्या पॅसेजमध्ये नाचणं सुरू ठेवते. पण, अशा प्रकारे ट्रेनच्या गर्दीत स्वत:चा जीव धोक्यात घालून डान्स करणं कितपत योग्य आहे.

तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करीत असाल, तर अनेकदा अनुभवलं असेल. काही गट करून बसणाऱ्या महिला असा थिल्लरपणा करताना दिसतात; ज्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास होतो. पण, कसलंही तारतम्य न बाळगता, त्या अशा वागतात. यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर तो पूर्ण गट त्या अडवण्यास आलेल्या व्यक्तीशी भांडायला तयार असतो. त्यामुळे काही मिनिटांच्या प्रवासासाठी लफडी कशाला म्हणून महिला प्रवासी त्यांचे चाळे सहन करीत गप्प बसतात. पण, अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणी रील बनवणे तुम्हाला कितपय योग्य वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“धावत्या ट्रेनमधून काही बरेवाईट झाले असते, तर” युजरची कमेंट

लोकल ट्रेनमधील हा व्हिडीओ @nirmalaFernandes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी कमेंटमध्ये महिलेला धावत्या लोकलमध्ये असा डान्स प्रकार करू नकोस, असा सल्ला दिला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, आमच्याच ट्रेनमध्ये लोक, ”पुढे जागा आहे. पुढे जा, असं का बोलतात.” दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, ”धावत्या ट्रेनमधून काही बरेवाईट झाले असते, तर काय केले असते…” अनेक युजर्सनी, ”ताई धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभं राहून जीव धोक्यात घालून अशा प्रकारे रील बनवू नकोस,” असा सल्ला दिला आहे.