नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना आमिष म्हणून पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून पुत्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संतापलेल्या आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी चक्क पोलीस ठाण्यातच अर्वाच्च भाषेचा मुक्त वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच ‘बघून’ घेण्याची धमकी दिल्याने पोलीस दलात अस्वस्थता पसरली आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या ‘तमाशा’नंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आ. पोकर्णा यांचे अधिकाऱ्यांशी विशेषत: पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी सख्य वा वैर सर्वश्रुत आहे. जमावासमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दमदाटीची भाषा वापरण्याचा प्रकार एकदा त्यांच्या चांगलाच अंगलट आला होता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकाऱ्यांशी उघड ‘पंगा’ घेऊन ते चांगलेच प्रकाशझोतात आले होते. शनिवारी रात्री लोहा शहरात त्याच घटनेची पुनरावृत्ती होत होती. पण सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी संयमाची भूमिका घेतल्याने अनर्थ टळला. लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसच्या उत्तम महाबळे, दीपक ठाकूर व स. हबीब स. रफीक या तिघांना पसे वाटताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांना तत्काळ ठाण्यात आणले व कायदेशीर कारवाई सुरु केली. आ. पोकर्णा यांचे पुत्र िपकु पोकर्णा यांनी हे पसे वाटण्यासाठी दिले होते. अशी माहिती या तिघांनी दिल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने पोलीस ठाण्यात जमले. तणाव निर्माण होऊ पाहत असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आ. अमर राजूरकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरेने पूर्ण करावी, असे सूचविले. गुन्हा दाखल झाल्यानंतर नियमानुसार जामीन देण्याची प्रक्रिया सुरु असतानाच आ. पोकर्णा पोलीस ठाण्यात आले. कोणतीही शहानिशा न करता अर्वाच्च भाषेत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच ‘बघून घेण्याची’ धमकी दिली. चढय़ा आवाजात आ. पोकर्णा यांनी, तुम्ही कोणाची सुपारी घेऊन काम करीत आहात, खोटा गुन्हा दाखल करता काय? काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, माझ्या मुलाला कोण पकडतो ते मी पाहतो, तुम्ही स्वतला सिंघम समजता काय? तुमच्या पोलीस महासंचालक व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करतो, तुम्हाला आजच्या कारवाईचे परिणाम भोगावे लागतील, असे धमकावल्यानंतर उपस्थित सर्वच जण अवाक झाले.
एकीकडे पोलीस अधिकारी समजावत असताना दुसरीकडे आमदारांचा आवाज वाढत गेल्याने काहीतरी अनर्थ होईल, असे वाटत होते. पण सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व पोलीस निरीक्षक सतीश टाक यांनी संयमाची भूमिका घेतली. काही वेळानंतर आ. पोकर्णा तावातावाने निघून गेल्यानंतर पोलीस निरीक्षक सतीश टाक यांनी घडलेला सर्व वृत्तांत पोलीस ठाण्याच्या ‘स्टेशन डायरीत’ नोंदविला. शनिवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने पोलीस दलात अस्वस्थता पसरली आहे. प्रामाणिकपणे काम करताना राजकीय दबाव बाजूला ठेवून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा अशाप्रकारे अवमान होणार असेल तर काम कसे करावे? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. शांत, संयमी राजकारणी अशी ओळख असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या प्रकरणात कोणाची बाजू घेतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार असले तरी पोलिसांच्या अस्वस्थेत मात्र भर पडली आहे.
८० टक्के मतदान
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी ८० टक्के मतदान झाले. काही प्रभागात ९० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात आले. १७ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणूक िरगणात असून या सर्वाचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबरदस्त चुरस आहे. काँग्रेसचे आ. अमर राजुरकर, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, कल्याण सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे बापुसाहेब गोरठेकर यांच्यासह अनेक मान्यवर लोह्यात तळ ठोकून होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. स्वत पोलीस अधीक्षक तानाजी चिखले मध्यरात्रीपासून लोह्यात होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपापर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर होतील.