महापालिकेतील कुशासनाला ठाणेकरांची चपराक

ठाणे महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत साटेलोटय़ाच्या राजकारणात धन्यता मानणाऱ्या नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाला नुकत्याच झालेल्या

ठाणे महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत साटेलोटय़ाच्या राजकारणात धन्यता मानणाऱ्या नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी घरचा रस्ता दाखविला असून या सर्व राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवणाऱ्या भाजपला कौल देताना महापालिकेत मोठा भाऊ म्हणून मिरविणाऱ्या शिवसेनेला मात्र अद्दल घडवल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे पुढे आले आहे.
महापालिकेच्या राजकारणात दादा मंडळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या दोन बडय़ा पदाधिकाऱ्यांची तर मतदारांनी डाळच शिजू दिलेली नाही. वर्षांनुवर्षे लाल दिवा मिरवूनही ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर निवडणुकीचा हंगाम जवळ येताच विकासकामांचा वसंत फुलविणाऱ्या नेत्यांनाही ठाणेकर मतदारांनी आपली जागा दाखवली आहे. त्यामुळे समन्वयाच्या नावाखाली ठाण्यात वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या मांडवली राजकारणाला मतदारांनी एक प्रकारे लागवलेली ही चपराक असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. ठाणे महापालिकेत वर्षांनुवर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जायचे आणि निष्ठावंतांना बाजूला सारत इतर पक्षांतील गणंगांना जवळ करण्यातच ठाणे शिवसेनेतील स्थानिक नेते गेल्या काही वर्षांपासून मश्गूल राहिल्याचे चित्र दिसत होते. कधी मुंब्य्रातील नगरसेवकाला जवळ करायचे, तर कधी इंदिसे कंपनी किंवा बसप वगैरेंसारख्या कुणाच्या तरी गळ्यात स्थायी समितीसारखे महत्त्वाचे पद टाकायचे, असे महापालिकेत वर्षांनुवर्षे सुरू आहे. सत्ता टिकविण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करण्याच्या फंद्यात निष्ठावंत शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाकडे पाठ फिरवल्यानेच शिवसेनेच्या ठाण्यातील राजकारणाची उतरंड सुरू झाल्याचे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. ठाणे शहरातून भाजपच्या चिन्हावर विजयी झालेले संजय केळकर यांच्या विजयात मोदी लाटेचा मोठा वाटा असला तरी महापालिकेतील या बजबजपुरीपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने तयार झालेल्या प्रतिमेचा फायदाही त्यांना मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दादा नगरसेवकांना घरचा रस्ता
ठाणे महापालिकेत ठरावीक नगरसेवकांचा एक मोठा गट प्रभावशाली असतो हे नेहमीच दिसून आले आहे. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आपल्या प्रभागातील कामे करून घेण्यासाठी एकीकडे धडपडत असताना विरोधी बाकांवर बसणारे काही नगरसेवक महापालिका चालवितात की काय, असे म्हणण्याजोगी परिस्थिती महापालिकेत आहे. राष्ट्रवादी नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, मनसेचे सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे नारायण पवार, मनोज िशदे, शिवसेनेतील नरेश म्हस्के, अशोक वैती अशा ठरावीक नगरसेवकांचा महापालिकेत दबदबा राहिला आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीत कोटय़वधी रुपयांच्या कंत्राटांचे बार कोणामुळे उडविले गेले हे लपून राहिलेले नाही. आयत्या वेळचे विषय कसे मंजूर होतात, इतिवृत्तातील नोंदी कशा बदलल्या जातात, महत्त्वाचे ठराव चर्चेविना मंजूर करण्यात कोणाचे हित लपले आहे, याच्या सुरस कथा महापालिका वर्तुळात मोठय़ा चवीने चर्चिल्या जात असतात. महापालिकेतील जुळवाजुळवीत माहीर असलेल्या या नेत्यांना विधानसभेचे गणित मात्र जमलेले नाही, हेच यंदाच्या निवडणुकीत दिसून आले. ओवळा-माजिवडा मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण या दादा नगरसेवकांना स्वत:चे डिपॉझिटही राखता आले नाही. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे िरगणात उतरलेले नारायण पवार यांनाही मतदारांनी सपशेल नाकारले. मुंब्य्रातील ज्येष्ठ नगरसेवक यासिन कुरेशी यांना मतदारांनी १५ हजार मतांच्या पुढे जाऊ दिले नाही. विधान परिषदेच्या उपसभापतिपदाचा लाल दिवा डोक्यावर असूनही वसंत डावखरे यांना आपला मुलगा निरंजन यांना ३० हजार मतांच्या पल्याड नेता आले नाही. तुमचा हा लाल दिवा आमच्या काय कामाचा, असा सवालच एक प्रकारे डावखरे यांना ठाणेकर मतदारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून विचारला आहे.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra assembly election result

ताज्या बातम्या