करोनाचा कहर वाढतच असून टोकाचे प्रयत्न करूनही सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनो, सेवा देण्यासाठी पुढे या अन्यथा नाईलास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिला आहे. या कायद्यामध्ये डॉक्टरांची नोंदणी रद्द करून तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे, असेही ते म्हणाले.

रुग्णाला दवाखान्यात जाताक्षणीच उपचार सुरु व्हायलाच पाहिजेत. रुग्णाला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करा. राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. एमबीबीएस गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा ६० हजार रुपये देते तर एमडी गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा दोन लाख रुपये देते. तरीही हे यायला तयार नाहीत, याबद्दलही मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखांची मदत

कर्तव्य बजावताना करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले यांच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. परभणी जिल्हा परिषदेने राज्य शासनास प्रस्ताव सादर केल्यावर एका दिवसात मंजुरी देण्यात आली असून उद्या धनादेश देण्यात येणार आहे.

आमदार प्रकाश आवाडे यांना बाधा

इचलकरंजी येथील आमदार प्रकाश आवाडे यांना करोना बाधा झाली आहे. त्यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्षा किशोरी व पुतण्या यांचा करोना अहवाल सकारात्मक आला असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी त्यांचा मुलगा, नातू, चुलत सून हे करोना उपचारातून बरे झाले आहेत. माजी आमदार, त्यांचे पुत्र, नगरसेवक, मुख्याधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी हेही करोनाबाधित झाल्याने चिंता वाढली आहे.