मुंबई : फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर छोटेखानी, पण निर्णायक खेळी करण्याची सूर्यकुमार यादवमध्ये क्षमता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळू शकेल, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने श्रेयस अय्यर गुरुवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी सूर्यकुमार आणि शुभमन गिल यांच्यात स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांपैकी एकाची निवड करणे अत्यंत अवघड असल्याचे शास्त्री म्हणाले.
‘‘तुम्हाला क्रमांकाचा विचार करून फलंदाज निवडावा लागेल. सूर्यकुमारला संधी मिळाल्यास तो त्याचा नैसर्गिक खेळ करेल याची खात्री आहे. त्याच्यामध्ये सातत्याने एक-दोन धावा काढत राहण्याची क्षमता आहे. भारतामध्ये फलंदाज म्हणून यश मिळवण्यासाठी तुम्ही धावफलक हलता ठेवून गोलंदाजाची लय बिघडवणे, त्याच्यावर दडपण टाकणे गरजेचे असते. सावध फलंदाजी करण्याचा काहीच फायदा नाही. ३०-४० धावांची छोटेखानी, पण आक्रमक खेळीही सामन्याचे चित्र पालटू शकते. सूर्यकुमार फटकेबाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही,’’ असे शास्त्री यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
‘‘गिल सध्या लयीत आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. भारताने १२ खेळाडूंचा विचार केला पाहिजे आणि सामन्याच्या दिवशी खेळपट्टी पाहून अंतिम ११ जणांची निवड केली पाहिजे,’’ असेही शास्त्री म्हणाले. गिलच्या गाठीशी १३ कसोटी सामन्यांचा अनुभव असून त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बांगलादेश दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक शतक झळकावले होते. दुसरीकडे, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये विश्वातील अव्वल फलंदाज असलेल्या सूर्यकुमारला अजून कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
शास्त्रींनी मांडलेले अन्य मुद्दे
- भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंना खेळवले पाहिजे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज असावेत. फिरकीपटू म्हणून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यासह भारताने ‘चायनामन’ कुलदीप यादवची निवड करावी.
- अश्विनने अतिविचार करू नये. त्याने एकच योजना आखून त्यानुसार गोलंदाजी केली पाहिजे. अश्विन उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याची कामगिरी मालिकेचा निकाल ठरवू शकते. तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.
- यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची उणीव भारताला जाणवेल. त्याची जागा घेण्यासाठी केएस भरत आणि इशान किशन यांच्यापैकी कोणाची निवड करायची हा निर्णय अवघड आहे. मात्र, ज्याचे यष्टिरक्षण अधिक चांगले आहे, त्याला संघात स्थान मिळाले पाहिजे.