कराड : कोयना शिवसागर निम्म्याने भरण्याच्या मार्गावर असून, पाणलोटातील दमदार पावसामुळे धरणात प्रतिसेकंद १८,७५२ घनफूट पाण्याची आवक राहताना, जलसाठा ४९.९६ अब्ज घनफूट/ टीएमसी (४७.४७ टक्के) झाला आहे. हा जलसाठा दिवसागणिक जवळपास दोन अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढत आहे. सध्या सर्वच जलसाठे उत्तम स्थितीत आहेत. पण, खरीप पेरण्या रखडल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत.

धोम, वारणा, दूधगंगा, धोम- बलकवडी, तारळी धरणक्षेत्रात दमदार तर, अन्य जलाशय परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर अशीच स्थिती दिसत आहे.

आज रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटात २०.३३ मिमी., कडवी धरण ३० मिमी., कास तलाव ३५ मिमी., दूधगंगा २९ मिमी., तारळी धरण २० मिमी., वारणा २२ मिमी., कुंभी १४ मिमी., धोम- बलकवडी १० मिमी., धोम ७ मिमी., उरमोडी ४ मिमी. असा धरण परिसरातील पाऊस आहे. तर, कास तलाव ३५ मिमी., ठोसेघर धबधबा परिसरात २१ मिमी. पाऊस झाला आहे.

यंदाच्या हंगामात आजवर सातारा तालुक्यातील सांडवली येथे सर्वाधिक १,८४७ मिमी पाऊस झाला असून, रविवारी दिवसभरात याच सांडवलीसह पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे सर्वाधिक ५७ मिमी पावसाची नोंद आहे. खालोखाल जोर येथे ५२ मिमी., जांभूरला ४९ मिमी., निवळे येथे ४५ मिमी., सावर्डेला ३१ मिमी. पावसाची नोंद आहे.

साताऱ्यातील जलसाठा उत्तम

सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, धोम- बलकवडी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांचा जलसाठा १४८.७४ अब्ज घनफूट असून, आजमितीला हा जलसाठा ७५.५४ अब्ज घनफूट (५०.७९ टक्के) झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा जलसाठा ४.९२ अब्ज घनफूट (५६.३३ टक्के) असून, तुलनेत हे धरणसाठे अतिशय उत्तम स्थितीत आहेत.

बळीराजा चिंताग्रस्तच

पश्चिम घाटक्षेत्रात पाण्याचा सुकाळ दिसत असला तरी खरिपाचा पेरा झालेला नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल आहे. मान्सूनपूर्व कोसळलेला तुफान पाऊस आणि त्यानंतर पावसाच्या सातत्यामुळे शेतशिवारात कुठे पाण्याचे तळे, कुठे चिखल, दलदल, प्रमाणापेक्षा जास्तीचा ओलावा यामुळे बहुतांशी क्षेत्रावर खरिपाचा पेराच झालेला नाही. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाणकारही गोंधळात

यंदाचा खरीप हंगाम कसा राहील. पेरण्या, टोकण्या कधी कशा होतील, हंगाम किती लांबेल किंवा काय याबाबत अनिश्चितता असून, जाणकार मंडळींसह कृषी अधिकाऱ्यांनाही पावसाच्या बिघडलेल्या गणिताने गोंधळात टाकले आहे.