Raju Shetti to Protest Against Shaktipeeth Expressway : माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सातत्याने शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. त्यांनी या महमार्गाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी कोल्हापूर व सांगलीमधील कारखानदार व लोकप्रतिनिधिंना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. शेट्टी यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीद्वारे त्यांनी उद्या (मंगळवार, १ जुलै शिरोलीतील पंचगंगा नदीच्या पुलावर आंदोलनासाठी जमण्याचं आवाहन केलं आहे.
राजू शेट्टी म्हणाले, “नदी प्रवाहात अडथळा निर्माण होऊन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याची गती मंदावली आहे. जिल्ह्यांमधील पंचगंगा, दूधगंगा, वेणगंगा, वारणा व कृष्णेसह इतर नदी पात्रांमध्ये गाळ व वाळू साठली आहे. नदीपात्र सपाट होत चाललं आहे. दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून कर्नाळ ते गारगोटी या ८५ किलोमीटरच्या परिसरात ३५ ते ४० किलोमीटर लांबीचा भराव पडणार आहे. परिणामी नदीच्या पाण्याला आणखी अडथळा निर्माण होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ६० हजार एकर जमीन क्षारपट झाली आहे. पुढील आठ-दहा वर्षांमध्ये शक्तीपीठ महामार्गामुळे एक लाख एकर जमीन क्षारपट होईल. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होईल.”
राजू शेट्टींचं कारखानदारांना विरोध करण्याचं आवाहन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधय्क्ष म्हणाले, “गेल्या वर्षी केवळ ८६ दिवस साखर कारखाने चालले. शक्तीपीठ महामार्गामुळे १५ ते २० टक्के जमिनीचं नुकसान होईल. परिणामी ऊस उत्पादन कमी होईल आणि कारखाने चालणं आणखी कमी होईल. त्यामुळेच आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. तसेच हा अव्यवहार्य मार्ग आहे. या महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचारही होणार आहे. केवळ सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता गरिबांवर, शेतकऱ्यांवर व येथील उद्योगधंद्यांवर आक्रमण करणारा, इथल्या लोकांना उद्ध्वस्त करणारा असा हा रस्ता आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. येथील कारखानदारांनी देखील सरकारला विरोध केला पाहिजे. कारखानदारांनी सरकारला घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या मिशीला कुठं खरकटं लागलं नसेल तर विरोध करा.”
“५० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात तुमचाही हिस्सा आहे असं जनतेला वाटेल”
राजू शेट्टी म्हणाले, “मला येथील लोकप्रतिनिधींना सांगायचं आहे की तुमच्यापैकी अनेकांनी याआधी सरकारला शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवणारी पत्रं दिली आहेत. मात्र, आता तुम्ही मूग गिळून गप्प बसू नका. तुम्ही गप्प बसलात तर या रस्त्याच्या कामात होणाऱ्या भ्रष्टाचारात, ५० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात तुमचाही हिस्सा आहे असं जनतेला वाटेल. तुमच्या हेतूंबद्दल जनतेच्या मनात संशय निर्माण होईल. त्यामुळेच १ जुलै रोजी शेतकरी दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून या महामार्गाचा विरोध करुया. मंगळवारी सकाळी ११ वाजता पुणे -बंगळुरू महामार्ग पंचगंगा पूल शिरोली या ठिकाणी सर्वजण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन करू.”