महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातही ठाकरे गटाने उमेदवार उभे केले आहेत. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत आधीपासूनच धुसफूस सुरू होती. परंतु, आता यादी बाहेर आल्यानंतर ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका केली. तसंच, मुंबईत काँग्रेसला दाबून टाकण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.
संजय निरुपम हे मुंबई उत्तर पश्चिम म्हणजेच मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. २०१९ च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, आता राजकीय गणिते बदलली असल्याने गजानन किर्तीकर शिंदे गटात गेले, तर त्यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर ठाकरे गटात आहेत. महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना संजय निरुपम की अमोल किर्तीकर असा पेच निर्माण झाला होता. काँग्रेसने या जागेसाठी मागणी केली होती. परंतु, ठाकरे गटाने या जागेवरून अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिल्याने संजय निरुपम यांचा पत्ता कट झाला आहे. परिणामी संजय निरुपम संतापले असून शिवसेनेने काँग्रेसवर अन्याय केला आहे, असं संजय निरुपम म्हणाले.
हेही वाचा >> Shivsena UBT Candidate List : लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, राजन विचारे, चंद्रहार पाटील यांना संधी
“काँग्रेसच्या नेतृत्त्वाने नेहमीच भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवला आहे. परंतु, आता ज्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याच उमेदवाराला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला हे दिसलं नाही का?” असा संतप्त सवाल संजय निरुपम यांनी विचारला. तसंच, या उमेदवारीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आक्षेप घेतला जावा”, अशी विनंतीही त्यांनी केली.
संजय निरुपम यांनी यावेळी काँग्रेसवर टीका करून पक्षाला घरचा आहेर दिला. संजय निरुपम म्हणाले, “पक्षाच्या नेतृत्त्वाला पक्षाची चिंता राहिलेली नाही. गेल्या १५-२० दिवसांपासून माझी कोणाशीही चर्चा झाली नाही. माझी अपेक्षा काय आहे? माझी अपेक्षा पूर्ण करण्याकरता काय करता येईल. अमुक एक गोष्ट करू शकत नाही, तर दुसरं काय करू शकतो? असं मला कोणीही विचारलेलं नाही. ज्याला जे करायचं आहे ते त्याने करावं, असं समजून कोणीही कसंही वागतंय. माझा मुद्दा असा आहे की, संपूर्ण देशात काँग्रेसने न्यायावर आधारित एक घोषणापत्र जाहीर केलं आहे. हिंदुस्तानी समाजातील विविध वर्गातील लोकांवर न्याय देण्याचं या घोषणापत्रातून म्हटलं जातंय. पण दुसरीकडे पक्षातील कार्यकर्त्यांवर न्याय मिळतोय की नाही याची चिंता राहिलेली नाही. न्यायाची भाषा करणारे त्यांच्या आत अन्याय होतोय यावर कोणीही बोलत नाही.”
काँग्रेस शिवसेनेसमोर झुकली
“वरिष्ठ नेतृत्त्वांकडून माझी अपेक्षा होती की २०१९ ला निवडणूक हरल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात सक्रिय आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढवण्याचा मला अधिकार आहे. परंतु, शिवसेनेने आम्हाला दाबलं. आणि दबले गेलो आहोत. आज असं दृष्य आहे की ज्या शिवसेनेची स्वतःचं काही अस्तित्व नाही त्यांच्यासमोर आम्ही झुकले आहोत. शिवसेनेचा जनाधार नाहीय. अशा कमी जनाधार असलेल्या पक्षासमोर काँग्रेसने झुकणं हे श्रद्धांजली लिहिण्याचा कार्यक्रम सुरू झालाय, असं दिसतंय”, असं संजय निरुपम म्हणाले.
फक्त एक आठवड्याची वाट पाहणार
“मी काँग्रेसच्या नेतृत्त्वाला सांगू इच्छितो की येत्या आठवड्याभरात मी वाट पाहीन. माझ्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत. आता जे काही होईल, ते आरपार होईल. येत्या काळात एका आठवड्याभरात याबाबत घोषणा ऐकायला मिळेल. त्यांच्या मनात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्या ऐकण्यासाठी एक आठवड्याची वाट पाहिली जाईल”, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.