आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. आपला देश जगातला सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेला देश झाला पाहिजे. भारत देशात सामर्थ्यशाली होण्याची ताकद आहे पण काही चुकीच्या धोरणांमुळे आणि स्वातंत्र्यानंतर राबवण्यात आलेल्या चुकीच्या धोरणांमुळे धनवान देश पण जनता गरीब राहिली असं चित्र आहे. चुकीची आर्थिक धोरणं, भ्रष्टाचारी सरकार आणि भविष्यातली दृष्टी नसलेले अधिकारी असल्याने देशाचं नुकसान झालं. मात्र आता देश बदलतो आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायचं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की भारत हा आत्मनिर्भर झाला पाहिजे. जर ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर Imort कमी केला पाहिजे आणि Export वाढवला पाहिजे. मी कोल्हापूरमध्ये आलो तेव्हा विचारलं की इथे ट्रॅक्टर्सचे पार्ट मिळतात, पण मग इथे ट्रॅक्टर का बनवत नाही? यासाठी लवकरच विचार झाला पाहिजे. आपण काही दिवसांपूर्वीच ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जपानला मागे टाकलं आहे. इलेक्ट्रिक ट्रक, लिथियम आर्यन बॅटरी, सोडियम आर्यन बॅटरी, फ्लेक्स इंजिन हे आणून आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याकडे ४०० तरूणांनी ई स्कूटर तयार केल्या आहेत. मी सगळ्यांना संमती दिली आहे. मी माझ्याकडे ई रिक्षा वापरतो. त्याचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत काहीही नाही असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली येत्या काळात ऑटोमोबाईल हब झालं पाहिजे यासाठी आम्ही विचार करतो आहोत असंही नितीन गडकरींनी जाहीर केलं.

मी महाराष्ट्रात साडेपाच लाख कोटींचे रस्ते बांधतो आहे

मी महाराष्ट्रातच साडेपाच लाख कोटींचे रस्ते बांधत आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यावेळी आपण सत्तेत असताना खंबाटकी घाटात टनेल कसा बांधला? तीन महिन्यात त्यावेळी निर्णय घेतला होता असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूरमध्ये इंजिनिअरींग कॉलेजेस आहेत. उत्तम मॅन पॉवर आहे. येत्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये कोल्हापूर पुढे गेलं पाहिजे. आपण डोळे दान करू शकतो पण दृष्टीकोन दान करू शकत नाही हे मी म्हणतो. कोल्हापूरला महालक्ष्मीचं वरदान आहे. देवीचा आशीर्वाद असा आहे की कोल्हापूरचं भविष्य आणि भवितव्य येत्या काळात देशातल्या तीन चार जिल्ह्यात पोहचेल असा विश्वासही मला वाटतो असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सगळ्या नव्या तंत्रज्ञानासह आपल्याला पुढे जायचं आहे. चांगली मार्केट झाली पाहिजे. आजच छत्रपती शाहू महाराज यांच्याशी बोलणं झालं. नागपूरला त्यांचं आणि आमचं घर समोर आहे. मी तिकडे माझं घर पाडलं, माझ्या सासऱ्याचंही घर पाडलं. रस्ते मोठे केले. कोल्हापूरमध्येही असाच निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. मी घरं पाडली असली तरी मोठ्या मताधिक्याने निवडून येईन असं मला विश्वास आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. जर आपण ठरवलं तर देश महाशक्ती बनेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या देशात पैशांची कमी नाही, माणसांची कमतरता आहे. ती कमतरता आपण भरून काढली तर आपण जगात सर्वात पुढे जाऊ शकतो यात शंकाच नाही असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.