राज्यात मागील दोन-तीन दिवसांत शेतकरी, कलादिग्दर्शक व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटना एका पाठोपाठ समोर आल्याने आणि दुसरीकडे मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची एकही वीट अद्याप रचली गेलेली नसतानाही कंत्राटदारांच्या पदरी ५०० कोटी रूपये पडावेत यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे दिसून येत असल्याने, विरोधी पक्ष भाजपाने राज्य सरकारवर जोरादार टीका केलेली आहे.

“MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही”

“राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्येचा मार्गावर असताना ठाकरे सरकार काय करतय, तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या १.प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या २. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्निल लोणकरची आत्महत्या ३. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या. मात्र राज्य सरकारची प्राथमिकता काय तर BDD चाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी वाकड परिसरातील फ्लॅटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. तसेच, पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत होत नसल्याने व त्यामुळे नोकरी मिळत नसल्याने स्वप्निलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना देखील घडलेली आहे. यामुळे भाजपा नेते आक्रमक होताना दिसत आहेत.

कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण : एकाला अटक, पाच जणांवर गुन्हा दाखल

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील ठाकरे सरकावर जोरदार टीका केलेली आहे.

“ MPSC ची परीक्षा पास होऊन देखील नोकरी नाही मिळाली म्हणून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली..सुन्न करणार्‍या या घटना सांगतात योग्य निर्णय योग्य वेळी नाही घेतला तर निष्पाप लोकांचे जीवन उध्वस्त होते.. जबाबदारी कोणाची व्यवस्थेची ना?” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

स्वप्निल लोणकर आत्महत्या : पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका , म्हणाल्या…

तर,“ स्वप्नील लोणकर या MPSC उत्तीर्ण झालेल्या आमच्या भावाचा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं जीव गेला त्याबद्दल सर्वज्ञानी संजय राऊत यांच्याकडनं अपेक्षित होते की आपल्या नेहमीच्या पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील नाहीतर नेहमीप्रमाणे केंद्राला तरी दोष देतील. पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत.. स्वप्नील लोणकर या आमच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली.” असं ट्विट करत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे..