मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत किंवा अत्यावश्यक कारणांसाठी लोकल किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीमध्ये साखळीची (अलार्म चेन पुलिंग) सुविधा असते. परंतु, अनेक प्रवासी अत्यंत अनावश्यक किंवा शुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळी ओढतात. यामुळे लोकल, मेल, एक्स्प्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. १ ते २० जून या कालावधीत मध्य रेल्वेवर ६६६ आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडल्या. याद्वारे ४६३ जणांवर कारवाई करून १.७० लाखांचा दंडवसूल करण्यात आला.

लांब पल्ल्याची रेल्वेगाडी इच्छित स्थानकात थांबण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वेगाडीची साखळी ओढतात. प्रवाशांना अपेक्षित स्थानकात चढण्यासाठी- उतरण्यासाठी आपत्कालीन साखळी खेचण्याचे प्रकार मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले. चुकून रेल्वेगाडीची साखळी ओढणे, प्रवासी वेळेत रेल्वेगाडीत चढू न शकल्यास संबंधित प्रवाशाचे नातेवाईक साखळी ओढतात, धावत्या रेल्वेगाडीतून मोबाईल खाली पडल्यास किंवा इतर किरकोळ कारणांमुळे साखळी ओढली जाते. मात्र, विनाकारण आपत्कालीन साखळी ओढणे रेल्वे कायद्यानुसार गुन्हा असून अशा प्रवाशांवर कारवाई केली जाते. असे असले तरीही किरकोळ घटनांसाठी साखळी ओढण्याचे प्रकार सातत्याने सुरू असून त्याचा फटका रेल्वेच्या वेळापत्रकाला बसतो आहे.

आपत्कालीन साखळीचा गैरवापर केल्याने मध्य रेल्वेवरील १ ते १९ जून या कालावधीत १५० रेल्वेगाड्यांना १० ते १५ मिनिटे उशीर झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ९८ रेल्वेगाड्यांना उशीर झाला होता. यामध्ये तब्बल ५३ टक्के वाढ झाली आहे. तसेच, १ ते १९ जून २०२५ या कालावधीत मुंबई विभागात अशी ५७ प्रकरणे नोंदवण्यात आली. मुंबई विभागात लोकल, रेल्वेगाड्या आणि मालवाहतूक गाड्या धावतात. त्यामुळे एका रेल्वेगाडीची साखळी ओढल्यास, मध्य रेल्वेच्या संपूर्ण विभागाचे वेळापत्रक कोलमडते.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर आणि नागपूर या विभागात १ ते २० जून या कालावधीत आपत्कालीन साखळी ओढण्याची ६६६ प्रकरणे नोंदवण्यात आली. ज्यातून ४६३ प्रवाशांवर खटला चालवण्यात आला. याद्वारे १.७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठे किती घटना (१ ते २० जून)

मुंबई विभाग – २५१ (१८४ जणांवर कारवाई – ६८,८०० रुपयांची दंडवसुली)
भुसावळ – १४९ ( ११९ जणांवर कारवाई – ४२,६०० रुपयांची दंडवसुली)
नागपूर – १३२ (८८ जणांवर कारवाई – २८,९०० रुपयांची दंडवसुली)
पुणे – ९५ (५४ जणांवर कारवाई – २३,६०० रुपयांची दंडवसुली )
सोलापूर – ३९ ( १८ जणांवर कारवाई – ६,५०० रुपयांची दंडवसुली केली)