मुंबई : संपूर्ण राज्यात रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई तसेच इतर भागात सोमवारी देखील पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्येकडून येणारे वारे तसेच पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे आणि आर्द्रता तयार झाल्यामुळे मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस पडला. त्याचबरोबर पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर शहर तसेच उपनगरात रविवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर सोमवारीही पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. शहराच्या तुलनेत उपनगरांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
पहाटेपासून घाटकोपर, अंधेरी, कुर्ला, पवई, सांताक्रूझ या भागात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी सकाळी ८:३० ते सोमवारी सकाळी ८:३० पर्यंत ११५ मिमी पाऊस नोंदला गेला. त्यानंतर सोमवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत कुलाबा केंद्रात ८.४ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात ८६.६ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत मंगळवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत वाऱ्यांचा वेगही जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भ, कोकणातही पावसाचा इशारा
कोकण, घाट परिसर आणि विदर्भात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर राहील. तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पावसामुळे दिलासा
पावसाने गेल्या आठवड्यात उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली होती. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांत अनेक भागात तापमानाचा पारा ३० अंशाच्या पुढे नोंदला गेला होता. यामुळे उन्हाचा ताप,उकाडा सहन करावा लागत होता. दरम्यान, राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली. तेथे ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तसेच सर्वाधिक पावसाची नोंद सांताक्रूझ येथे झाली आहे.