मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वांद्रे-वरळी सागरी सेतूवर मागील काही दिवसांपासून डिजिटल जाहिरातील झळकत आहेत. या जाहिरातींमुळे दृश्य प्रदूषणाचा धोका निर्माण झाला असून प्रकाशमान मर्यादेचेही उल्लंघन होत आहे.

त्याचबरोबर वाहनचालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघाताची भीती निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या जाहिरातींसाठी वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या जाहिराती अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. यासंबंधीच्या तक्रारीची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

एमएसआरडीसीने ५.६ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सागरी सेतू बांधला आहे. हा सागरी सेतू मार्च २०१० मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या सागरी सेतूमुळे वांद्रे – वरळी प्रवास अतिजलद झाला आहे. या सागरी सेतूवरील केबल स्टेडवर मागील काही दिवसांपासून डिजिटल जाहिराती झळकत आहेत. जिलेट ब्लेड, फिल्मफेअर, सुपरमॅन कँपेनिंगसारख्या जाहिरातींचा यात समावेश आहे.

या डिजिटल जाहिराती अनधिकृत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. याबाबत त्यांनी वाहतूक पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. एमएमआरडीसीलाही यासंदर्भात पत्र पाठवून तात्काळ या जाहिराती हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. गलगली यांच्या तक्रारीनुसार या जाहिराती अनधिकृत आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांची परवानगी न घेता या जाहिराती लावण्यात आल्या असून त्या अनधिकृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतू अतिजलद मार्ग असून यावरून वेगाने मोठ्या संख्येने वाहने धावतात. अशावेळी डिजिटल जाहिरातींमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांसमोर अंधारी येण्याची, दृष्टीवर परिणाम होऊन अपघात होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. तर दृश्य प्रदूषणाचीही भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे या अधिकृत जाहिराती एमएसआरडीसीने तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गलगली यांच्या तक्रारीची वाहतूक पोलिसांनी दखल घेतली आहे. सागरी सेतूवरील डिजिटल जाहिरातींसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्यात आलेली नसून याअनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती अनिल कुंभारे, सह पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा यांनी दिली. याविषयी एमएसआरडीसीकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.