मुंबई : येत्या चार आठवड्यांत देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढून वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल होतात आणि त्यानंतर ते हळूहळू देशाच्या इतर भागांमध्ये पसरतात. यंदा केरळमध्ये वेळेपूर्वी मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने येत्या चार आठवड्यातील पावसाचे विस्तारित पूर्वानुमानानुसार पहिला आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिशा व ईशान्य भारतातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात पश्चिम किनाऱ्यावर सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण भारत, महाराष्ट्र, पूर्व भारतातील अनेक भाग, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आठवड्यात कर्नाटक, ईशान्य किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वायव्य भारत, तामिळनाडू वगळता देशातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात पूर्व भारत, मध्य भारत, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक, केरळच्या किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान). यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.

पूर्व मोसमी पावसाचा जोर अधिक राहणार

पुढील पंधरा दिवस म्हणजेच ३१ मेपर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होईपर्यंत कोकण किनारपट्टी तसेच संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह गडगडाटी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर मुंबई समोर अरबी समुद्रात केंद्र असलेले एक व तेलंगणा राज्यावर केंद्र असलेले असे दुसरे अशा दोन आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची ही शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चौदा जिल्ह्यात वळिवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.