मुंबई : छठपूजेनिमित्त मुंबई, पुण्यावरून उत्तर आणि पूर्व भारतात जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी निघाले आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेवरून १,९९८ रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे. यामधून तब्बल ३० लाख उत्तर भारतीय प्रवास करू शकतील. सध्या मुंबई, पुण्यासह मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांतून ७०५ रेल्वेगाड्या धावल्या असून यामधून १०.६८ लाख उत्तर आणि पूर्व भारतीय प्रवाशांनी प्रवास केला.
दिवाळी-छठ पुजेनिमित्त भारतीय रेल्वे १२,०११ विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे १,९९८ आरक्षित आणि अनारक्षित रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन आहे. या रेल्वेगाड्या बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यात जात आहेत. मुंबईतून ६०० हून अधिक रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या.
तर, दररोज १०० नियमित आणि ८ ते १० विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. २६ ऑक्टोबर रोजी २४ रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. दरररोज बिहारला जाणाऱ्या २२ अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी दिली.
तात्पुरत्या स्वरुपात विश्रांतीगृह
सीएसएमटी येथे १,२०० चौमीचे तात्पुरत्या स्वरुपास विश्रांतीगृह तयार करण्यात आले असून यामध्ये सामानासह सुमारे १,५०० प्रवासी बसू शकतात. एलटीटीमध्ये १० हजार चौमीचे तात्पुरत्या स्वरुपास विश्रांतीगृह तयार करण्यात आले असून १० हजारांहून अधिक प्रवाशांना सामावून घेऊ शकेल.
प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दादर येथे ४७, सीएसएमटी येथे ९०, एलटीटी ७० आणि कल्याण ६६ येथे अतिरिक्त आरपीएफ आणि रेल्वे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बिहारला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या सुरक्षेसाठी ६० अतिरिक्त कर्मचारी तैनात आहेत.
उत्तर आणि पूर्व भारतात जाणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी ५८ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत. हे प्रवासी मुंबई, पुणे, नागपूरवरून रेल्वे प्रवास करीत आहेत. राजस्थान, दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी सीएसएमटी, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या स्थानकांतून मोठ्या संख्येने रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन आहे. तसेच फलाटावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. रेल्वेगाड्यांसाठी फलाट निश्चित करण्यात आले आहेत.