मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून मध्य रेल्वे प्रशासनाने दादर-रत्नागिरी रेल्वेगाडीची थेट सेवा बंद केली आहे. दादर-रत्नागिरी रेल्वेगाडीची सेवा सुरू करण्यासाठी उपोषण करण्यात येणार असून गांधी टोपी परिधान करून, मौन बाळगून बसलेल्या प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.
गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस पॅसेंजर गाडी १९९६/९७ सालापासून सुरू झाली. त्यानंतर प्रवाशांची मागणी वाढल्याने ही रेल्वेगाडी रत्नागिरी-दादर मार्गावर धावू लागली. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीमधील सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबा घेत असल्याने ही रेल्वेगाडी कमी कालावधीत लोकप्रिय झाली. कोकणातील प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी या रेल्वेगाडीचा आधार होता. परंतु, करोना काळात मार्च २०२० पासून ही रेल्वेगाडीची सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर अद्यापपर्यंत ही सेवा सुरू केली नाही.
मुंबई आणि चिपळूण दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी. या रेल्वेगाडीला द्वितीय श्रेणी आरक्षित, वातानुकूलित चेअर कार व सामान्य अनारक्षित डबे असावेत. यासह या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापुर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबा असावा.
तसेच ही रेल्वेगाडी पहाटे किंवा सकाळी लवकर मुंबईतून चालविण्याचे आणि चिपळूणवरून दुपारी किंवा सांयकाळी मुंबईकडे रवाना करण्याचे वेळापत्रक असावे. ही रेल्वेगाडी नमो भारत रॅपिड रेल (वंदे मेट्रो) रेकने चालवल्यास प्रवाशांचा फायदा होऊ शकतो, असे जल फाऊंडेशन कोकण विभागाद्वारे सांगण्यात आले.
गेली अनेक वर्षांपासून मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडे दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पत्रव्यवहार करून, पाठपुरावा करून, रेल्वे प्रशासन मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे या मागण्या मान्य होत नसल्याने २ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. यावेळी गांधी टोपी परिधान करून, प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा धिक्कार केला जाईल. परप्रांतीयांच्या रेल्वेगाड्या चालविण्यासाठी रेल्वे मार्ग खुले केले जातात. परंतु, कोकणातील रेल्वेगाड्या चालवण्यासाठी कायम अडचण असते. रेल्वे प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास उपोषण केले जाणार आहे. – नितीन जाधव, संस्थापक आणि अध्यक्ष, जल फाऊंडेशन कोकण विभाग.