मुंबई : राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून मराठवाड्यात त्याची नोंद अत्यल्प झाली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागांत पावसाची तूट आहे. जून महिन्यांत नाशिकमध्ये सर्वाधिक, तर बीडमध्ये सर्वात कमी पाऊस पडला.
यंदा २५ मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. लगेच दुसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी आगेकूच सुरु केली. मुंबईसह, पुणे आणि इतर काही भागात २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल झाला. साधारण १ जूनपासून राज्याच्या बहुतेक भागांसह किनारपट्टीवर मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. त्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. पण, जूनच्या मध्यात पुन्हा सक्रीय झालेल्या पावसाने जूनची सरासरी भरून काढली. जून महिन्यात राज्यात १ ते ३० जून या कालावधीत २०९.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. पण, यंदा जूनमध्ये २२२.३ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा ६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. कोकण विभागात सरासरी ७०१.१ मिमी पाऊस पडतो. यंदा ७८४.३ मिमी पाऊस पडला. कोकणातील पाऊस सरासरी इतकाच म्हणजेच १२ टक्के आहे. मध्य महाराष्ट्रात १५७.७ मिमी पाऊस पडतो, यंदा तो २१३.२ मिमी झाला असून सरासरीपेक्षा ३५ टक्के जास्त आहे. विदर्भात १७५.४ मिमी पाऊस पडतो. यंदा १५५.१ मिमी झाला असून २०.३ मिमी तूट आहे. याचबरोबर मराठवाड्यात १३४.७ मिमी पाऊस पडतो, यंदा ७८.८ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात ५५.९ मिमी पावसाची तूट आहे. याचबरोबर संपूर्ण देशात १६५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा देशात १८० मिमी पाऊस पडला आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज
मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. राज्याच्या विविध भागात सध्या पाऊस पडत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मोसमी पाऊस सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती असल्याने देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात पुढील सहा ते सात दिवस पावसाला पोषक वातावरण राहील.
जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज
जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज हावामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यंजय महोपात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने जुलै महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याचबरोबर देशात जुलै महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लडाख, बिहार, पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य भारत, उत्तर भारत वगळता देशभरात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक रहाण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यात पावसाने सरासरी गाठली. मात्र पावसाचे वितरण असमान होते. जुलै महिन्यात मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्वच भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.