मुंबई : तांबूस रंगाची पाठ असलेला झाडी सापाच्या (ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक) प्रजातीचा मुंबईत अधिवास असण्याची शक्यता एका संशोधनात वर्तविण्यात आली आहे. रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ फॉर वाइल्ड लाइफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेने मुंबईत रुका साप पकडले होते. हे साप पश्चिम घाटात आढळणाऱ्या रुका प्रजातीपेक्षा काहीसे वेगळे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे रुका सापाच्या नव्या प्रजातीचा मुंबई अधिवास असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ब्रॉन्झबॅक ट्री स्नेकला ‘तांबूस रंगाची पाठ असलेला झाडी साप’ किंवा ‘कॉमन ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक’ म्हणतात. हा एक बिनविषारी साप आहे. तो प्रामुख्याने भारतामध्ये आढळतो. या सापाचे शरीर पातळ आणि लांब असते, आणि त्याचा रंग साधारणपणे तपकिरी किंवा कांस्य रंगाचा असतो, त्यामुळे त्याला ‘ब्राँझ बॅक’ म्हणतात. त्याच्या शरीराच्या बाजूने फिकट पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. सरासरी, या सापाची लांबी ४ फूट असते. दरम्यान, ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक या सापाच्या प्रजातीचे पश्चिम घाटात अस्तित्व असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
एकूण १० सापांना जीवदान
रॉ या संस्थेने ४ फेब्रुवारी २०२१ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मुंबईतून एकूण १० ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक सापांना जीवदान दिले होते. यापैकी २ साप पश्चिम घाटात आढळणाऱ्या ब्रॉन्झबॅक ट्री स्नेकच्या प्रजातींपेक्षा वेगळे होते. रॉचे संचालक पवन शर्मा, सिद्धार्थ परब, अनिल कुबल, महेश इथापे आणि पूर्वेंद्र जठार यांनी या संदर्भात संशोधन केले.
दरम्यान, जीवदान मिळालेले १० पैकी ८ साप हे ‘कॉमन इंडियन ब्रॉन्झबॅक’ प्रजातीचे आहेत. विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरात पकडलेल्या सापांचे आकारशास्त्रीय वैशिष्ट्य सारखेच आहे. मात्र, खवल्यांची संख्या, डोर्सोलॅटरल रेषा, वेंट्रोलॅटरल रेषा, शरीराचा आकार, चेहऱ्यांवरील रंग या कोणत्याच स्तरावर दोन्ही साप या तिन्ही प्रजातींसोबत जुळत नाहीत. त्यामुळे या सापांचा मुंबईत अधिवास असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधित शोधनिबंध ‘रेपटाइल्स ॲण्ड हॅम्पिबियन्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.