मुंबई : राज्य सरकारमधील कलंकित, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्री आणि आमदारांना बडतर्फ करावे. सरकार भ्रष्ट आमदार व मंत्र्यांना पाठीशी घालत असून राज्यपालांनीच आता कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली.

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय गायकवाड, विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे समोर आली. या प्रकरणांवर विरोधी पक्ष म्हणून पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात आला. मात्र सरकारकडून न्याय मिळत नसून सरकारच या कलंकित मंत्र्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे न्याय मागण्यासाठी आलो आहोत. राज्यपाल आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे, असे परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले.

शिरसाट यांच्या घरात नोटांनी खचाखच भरलेली बॅग आढळली. त्यांनी हॉटेल व्हिट्सच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा केला, एमआयडीसीतील पार्किंगचा भूखंड स्वतःसाठी घेतला. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपमानजनक वक्तव्य केली. लोकशाहीच्या मंदिरात ते रमी खेळताना आढळले आहेत. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या डान्सबारवर पोलीसांनी कारवाई करून २२ बारबाला पकडल्या. राज्याचे गृह राज्यमंत्री बेकायदेशीर डान्सबार चालवतात. लोकांच्या घरकुलाच्या वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. तरीही राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री झोपलेले आहेत का ? असा सवाल दानवे यांनी यावेळी केला.

हनी ट्रॅपमध्ये काही मंत्र्यांचा सहभाग आहे. एकनाथ खडसेंनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला. ठाणे-घोडबंदर भुयारी मार्गातील निविदेतील घोटाळा, पडळकर यांचे ख्रिश्चन समुदायाला उद्देशून ठोकून काढा हे वादग्रस्त विधान, तसेच एका वृद्ध महिलेची १७ एकर जमीन हडप केल्याचे प्रकरण, नितेश राणेंची वादग्रस्त विधाने, आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालय आमदार निवासाच्या उपहारगृहातील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, अर्जुन खोतकर यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान कोट्यवधी रुपये सापडणे याबाबत राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपाल न्याय देतील अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी न्याय दिला नाही तर आम्ही जनतेच्या दरबारात जाणार, असे दानवे म्हणाले. राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार अनिल परब, नितीन देशमुख, अनंत नर, महेश सावंत, मनोज जामसुतकर, मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विनोद घोसाळकर, विशाखा राऊत, नेत्या सुषमा अंधारे इत्यादींचा समावेश होता.