अकोला : यंदा वरुण राजाने अकोला जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी दाखवली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३६.९ मि.मी. आहे. यंदा जून महिन्यात १५५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३९ मि.मी. होते. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे.
जिल्ह्यात मोसमी पूर्व व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. संपूर्ण जून महिन्यातील जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चांगलाच पाऊव कोसळला. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अकोट तालुक्यात सरासरी पर्जन्यमान १२४.५ मि.मी. आहे. यंदा जून महिन्यात १५३.६ मि.मी. पाऊस पडला. हा पाऊस सरासरीच्या १२३.३ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १८०.८ मि.मी. होते. तेल्हारा तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १२० मि.मी. आहे. या तालुक्यात यंदा जून महिन्यात १६३.२ मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या १३६.१ टक्के आहे.
गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३४.२ मि.मी. होते. बाळापूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १३०.१ मि.मी. असून यंदा जून महिन्यात १७१.८ मि.मी. पडला. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १२४.६ मि.मी. होते. पातूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १५५.६ मि.मी. आहे. तालुक्यात यंदा २१८.२ मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या १४०.३ टक्के हा पाऊस आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १७१.४ मि.मी. होते. अकोला तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १३४ मि.मी. व तालुक्यात यंदा जून महिन्यात १३१.८ मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ९८.४ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १११.९ मि.मी. होते. बार्शीटाकळी तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४८.१ मि.मी. आहे. तालुक्यात यंदा जून महिन्यात १८०.८ मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या १२२.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३३.६ मि.मी. होते. मूर्तिजापूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४५.८ मि.मी. आहे. तालुक्यात यंदा ११८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या ८१.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३८.५ मि.मी. होते.
पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे अकोला व नजिकच्या जिल्ह्यांत आजपासून ४ जुलैपर्यंत अतिवृष्टी व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वीज पडण्याची सूचना मिळवण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.