नागपूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पावसाचा “येलो अलर्ट” दिला आहे. पूर्व विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांना “येलो अलर्ट” दिला असून उर्वरीत जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून, कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात, विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. सोमवारी राजधानी मुंबईत जोरदार पाऊस पडला, तर उर्वरित ठिकाणी दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरीमागून सरी सुरूच होत्या. आजही कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तसेच पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. गणरायाच्या आगमनापूर्वीच राज्यात पावसाची जोरदार हजेरी दिसून येत आहे. राज्यात कोकणात मुसळधार, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी राज्यातील तब्बल १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस एवढे असेल. तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यांना २६ ऑगस्टसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार आहे. पुण्याच्या घाट परिसराला मुसळधार तर पुणे शहरांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.