नागपूर : ‘विफा’ चक्रीवादळाचे अवशेष असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने काल व्यक्त केली होती. ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारा आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे रायगडसह संपूर्ण कोकणाला दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. २५ आणि २६ जुलैला महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत अन् घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना “रेड अलर्ट” ?
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालये बंद?
चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना हवामानाच्या इशाऱ्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे.
गडचिरोली जिल्ह्याला कोणता अलर्ट?
गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे पूर येण्याचा आणि विजांचा कडकडाट होण्याचा धोका असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
कोकण किनारपट्टीला कोणता इशारा ?
उंच लाटा येण्याचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय.