नागपूर : मान्सूनच्या परतीचा प्रवास आता वेग धरु लागला असून उत्तर आणि ईशान्य भारताच्या अनेक भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. तर सोमवारी बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. तर येत्या दोन दिवसात मान्सून गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या उरलेल्या भागातून व महाराष्ट्राच्या काही भागातून माघारी फिरेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असतानाच विदर्भाच्या बाबतीत खात्याने आज आणखी एक घोषणा खात्याने केली आहे.

राज्याच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. परतीच्या पावसाची वाटचाल वेगाने सुरू झाली असतानाच राज्यातील काही भागात ‘ऑक्टोबर हीट’च्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परतीच्या पावसाने जोर धरला असला तरीही उकाडा मात्र अजूनही कायमच आहे. गेल्या काही दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर सोमवारी देखील विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आज, मंगळवारी १५ ऑक्टोबरला विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उपराजधानीत अंशत: ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे ही वाचा…भाजप नेते धनंजय महाडिक म्हणाले… जाहीरनाम्यात ३१ मुद्यांवर काम,लोक सूचनांचाही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अमरावती, वर्धा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी काही ठिकाणी उन्हाचा कडाका सहन करावा लागणार आहे. राज्यात मोसमी वाऱ्यासह पावसाचा परतीचा प्रवास सुरू असल्याने अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने मंगळवारी संपूर्ण कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. मराठवाड्यात धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उकाडा आणि पाऊस अशा विचित्र कात्रीत नागरिक अडकले असतानाच आत, मंगळवारी नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भातून नैऋत्य मोसमी पाऊस पूर्णपणे परतल्याची घोषणा एका प्रसिद्धी पत्रकातून केली. त्यामुळे येत्या काही दिवसात उकाडा संपेल आणि थंडीची चाहूल लागेल, या प्रतिक्षेत नागरिक आहेत.