नाशिक – उपमुख्यमंत्री अजित पवार हे भावकीला विसरलेले नाहीत. पवार कुटुंबातील लग्न, साखरपुडा आदी कार्यक्रमात हे सर्व एकत्र येतात. ना अजित दादा भावकीला विसरले, ना रोहित पवार विसरले. यात आम्हाला आनंद आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

सांगली येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे (शरद पवार ) माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. रोहित पवार आदी नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार गावकीचा विचार करतात, पण भावकीला ते विसरले असे विधान केले होते. त्याला त्याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. भावकीकडे लक्ष दिले म्हणून तू आमदार झालास अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर पलटवार केला होता. या घटनाक्रमावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आ. रोहित पवार हे भावकी विसरली नसल्याचे त्यांनी मिस्किलपणे सांगितले.

मंत्रिपद गेल्यानंतर अनेक महिन्यांपासून धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्यावर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. यावर आपण बोलणे उचित नसल्याचे भुजबळांनी नमूद केले. मुंडे हे आमचे सहकारी आहेत. तो बंगला मला मिळाला आहे. मुंडे यांच्या काही अडचणी आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही खूप अवहेलना सहन करावी लागत असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान केले होते. यावर भुजबळांनी सहानुभूती दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

मनोज जरागेंना शांततापूर्ण आंदोलनाचा सल्ला

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर भुजबळांनी आंदोलनाला कोण नकार देऊ शकते, असा प्रश्न केला. संविधानानुसार शांततापूर्ण आंदोलन करण्याची प्रत्येकाला मुभा असून त्यांनी ते करावे, असा सल्ला त्यांनी दिला. स्वातंत्र्य दिनी जालना येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाला लाथ मारण्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यात लिहिण्याचे, बोलण्याचे, आंदोलन करण्याच्या स्वातंत्र्याचा समावेश असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सरकारी कार्यक्रमात अडथळा न आणता कुणाचे शांततापूर्ण आंदोलन सुरू असेल तर, त्यास आक्षेप घेण्याचे कारण नाही. मनोज जरांगे असो वा कुणीही असो, दोन्ही बाजुने संयम ठेवायला हवा, याकडे भुजबळांनी लक्ष वेधले.