नाशिक: प्रिंटरद्वारे पाचशेच्या बनावट नोटा काढून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार झाला. यातील प्रमुख संशयित अशोक पगार यासह अन्य दोन जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना अशोक पगार (४५, मेंढी, सिन्नर) हा बनावट नोटा चलनात आणणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार यांना दिली. त्यांनी भुरे, अंमलदार किरण गायकवाड तसेच अन्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन माऊली लॉन्स येथे सापळा रचला. पहाटे अडीचच्या सुमारास पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ३० बनावट नोटा मिळून आल्या. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे आणि भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा तयार केल्याचे सांगितले.
हेही वाचा : माजी महापौर गोळीबारप्रकरणी मालेगावात दोघांना अटक
यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांची दोन तपास पथके तयार करून संशयित हेमंत कोल्हे (३२, रा.सेक्टर नंबर १०, आनंद निवास, प्लॉट नंबर १०१, वाशी, नवी मुंबई) यास नाशिकमधून अटक केली. नंदकुमार मुरकुटे (५२, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली, सिन्नर) यास सिन्नर येथे सापळा रचून अटक केली. चौथा संशयित भानुदास वाघ ( नांदूर शिंगोटे ) हा फरार झाला. संशयितांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली, नोटा कोठे वितरित केल्या, नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झाला का, या बाबींचा पोलीस आता शोध घेत आहेत.
हेही वाचा : नाशिक, सिन्नर तालुक्यात चारा टंचाईचे संकट
मित्रांचे भांडण झाल्याने प्रकार उघड
बनावट नोटा तयार करण्याचे काम पगार आणि त्याचे मित्र करत होते. त्या नोटांवरून मित्रांचे भांडण झाल्याने हा प्रकार उघड झाला. या बाबत माहिती मिळाल्यानंतर सापळा रचत अटक झाली. २५ हजार रुपयांची छपाई करण्यात आली असून संगमनेर येथील एका बँकेत यातील काही रक्कम भरली असून काही पैसे प्रवास भाड्यात खर्च झाले आहेत. पगार याला आधीच २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुरकुटे आणि कोल्हे यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दिलीप ठाकूर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)