नाशिक – गणेशोत्सवास अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. कोकणातील गणेशोत्सव कायमच चर्चेत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातून काही बसेस कोकणवासीयांच्या सेवेसाठी रवाना करण्यात आल्याने नाशिक विभागातील काही ठिकाणच्या बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. साधारणत: २६ ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती राहणार असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या करण्यात आले आहे.

या वर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. यामुळे उत्साहाला उधाण आले आहे. गणेशोत्सवाचा खरा आनंद आणि पारंपरिक पध्दतीचा अनुभव केवळ कोकणातच येतो. कोकणवासियांना गणेशोत्सवाची कायमच ओढ असते. त्यामुळेच मुंबई, ठाणे, पुण्यासह देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात कामानिमित्त, व्यवसायानिमित्त गेलेला कोकणवासी गणेशोत्सवाच्या दहा दिवस आवर्जुन कोकणात आपल्या गावी जातोच. कोकणात गणेशोत्सवापूर्वी घरांची स्वच्छता आणि रंगरंगोटी केली जाते. कोकणात अनेक जण हातानेच गणेशाची मूर्ती घडवितात. घरांमध्ये सजावट केली जाते. फुले आणि फळे यांची आरास केली जाते. गणपतीच्या स्थापनेनंतर प्रत्येक घरातील, गावातील वातावरण पूर्णपणे बदलते. गावात गटागटाने मिळून प्रत्येक घरात जाऊन वाद्य वाजवून भजन, गाणी सादर केली जातात.

गणेशोत्सवात कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाचे विविध विभाग सक्रिय झाले आहेत. कोकणातील गणेशोत्सवासाठी नाशिक प्रादेशिक म्हणजे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यातून १२५० बसेस कोकण विभागाकडे रवाना झाल्या आहेत. शनिवारपासून २६ ऑगस्टपर्यंत या बस कोकणवासीयांच्या सेवेत राहणार आहेत. त्यामुळे या पाचही जिल्ह्यातील बसफेऱ्यांची संख्या कमी करणे भाग झाले आहे. त्याचा फटका या भागातील प्रवाशांना बसला आहे.

राज्य परिवहन महामंडळाने कुठलीही पूर्वसूचना न दिल्याने नाशिक विभागातील बसफेऱ्या कमी केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. कौटुंबिक उत्सवासाठी मला पुण्याला जायचे आहे. बस मिळण्यासाठी एक तासांहून अधिक काळ प्रतिक्षा करत आहोत. परंतु, बस मिळत नाही. धुळे, नंदुरबारसह सटाणाकडे जाण्यासाठी तर प्रवाशांना दोन- दोन तास बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. नेहमी वेळेवर येणारी बस का येत नाही, या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने प्रवासी चक्रावले आहेत.

याविषयी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाचे नाशिक विभाग नियंत्रक किरण भोसले यांनी माहिती दिली. गणेशोत्सवासाठी कोकण विभागासाठी नाशिक प्रादेशिक कार्यालयातून १२५० बस पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगरच्या काही बस आहेत. नाशिकमधील ३५० हून अधिक बस कोकणात पाठविण्यात आल्या आहेत. काही बस २६ ऑगस्टनंतर परत येतील, असे भोसले यांनी सांगितले. या काळात खरे तर प्रवाशांची गर्दी कमी असते. रक्षाबंधन काळात प्रवाशांची ये- जा झालेली असते. सध्या गर्दी कमी असल्याने बस कोकण विभागात सेवा देतील. अन्य बस या नियोजित मार्गावर ठराविक कालावधीत धावत राहतील. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले.