नाशिक – दिल्लीत भाजपची सत्ता आहे. अमित शहा हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुणालाही भेटतात. सुप्रिया सुळे या तर खासदार आहेत. त्यांनी भेटीची वेळ खरंच मागितली होती की नाही, ते माहिती नाही, असे सांगत भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी खा. सुळे यांना प्रत्युत्तर दिले.

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे १० वेळा भेटीची वेळ मागितली. परंतु, आपणास वेळ देत नाही, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तरी, आपले काहीही अडत नाही. दिल्लीत मी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांना भेटून कामे करून घेते, असे खा. सुळे यांनी म्हटले होते. नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या सहकारी फेडरशनच्यावतीने रविवारी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन आ. प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर त्यांनी खा. सुळे यांंना लक्ष्य केले. खा. सुळे यांच्याकडून भेटीचे नाटक होत असण्याची साशंकता त्यांनी व्यक्त केली. खाण्यापिण्यावर टीका करणे योग्य नाही. राज्यात कोणी काय खायचे ते खाऊ शकतात. त्यावर कुठलीही बंदी नाही. आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा आहे. खा. सुळे यांना हे शोभणारे नसल्याचे दरेकर यांनी सुनावले.

मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० टक्के आरक्षण दिले आहे. कायद्याच्या चौकटीत असेल ते आरक्षण दिले जाईल. मतचोरीच्या आरोपांविषयी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शपथपत्र दिले नाही. तोंडी आरोप चालत नसतात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही पुरावे असतील तर, निवडणूक आयोगाला सादर करावे. निवडणूक हरल्यानंतर अशी कारणे दिली जातात. उद्याचा पराभव दिसत असल्याने असे काही प्रश्न पुढे आणले जात असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला.

लाडकी बहीण योजनेतील बनावट लाभार्थ्यांवर सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल. बनावट लाभार्थ्यांचे कुणीही समर्थन करणार नाही. सुरुवातीच्या काळात पूर्ण पुष्टी करता आली नाही. ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळणे गरजेचे त्यांनाच तो मिळेल. हा जनतेच्या कराचा पैसा आहे. सरकारची नवीन योजना येते, तेव्हा ती स्थिर होण्यासाठी वेळ जातो. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही ताण नाही, असा दावाही आ. दरेकर यांनी केला. नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला मिळावे, ही अपेक्षा आहे. छगन भुजबळ यांच बळ हे सरकारमधील बळ असल्याचे त्यांनी सूचित केले.