नाशिक – महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि राजकीय पक्षांकडून मोर्चे, आंदोलनाचे सत्र सुरू झाले. खड्डेमय रस्ते, अपुरा पाणी पुरवठा व अन्य नागरी समस्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आल्या आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून आंदोलने व मोर्चे काढले जात आहे. आता प्रागतिक पक्ष आणि जन संघटनांनी मोर्चाची हाक दिली आहे.
महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अलीकडेच जाहीर करण्यात आली. यावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. आगामी निवडणुकीची तयारी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. जवळपास तीन वर्ष महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती. या काळात नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड होत आहे. विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधारी व प्रशासनाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
मागील दीड ते दोन महिन्यात महापालिकेशी संबंधित प्रश्नांवरून मनसेने दोनवेळा, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष आदींनी विविध मुद्यांवर महापालिकेवर मोर्चा काढला वा आंदोलने केली. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर मनसेने हंडा मोर्चा देखील काढला होता. तर शिवसेना ठाकरे गटाने शालिमार चौकात निदर्शने केली.
नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करीत प्रागतिक पक्ष व जन संघटनांनी महापालिकेवर १० सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातून दुपारी साडेतीन वाजता हा मोर्चा निघणार आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाढता वाहतूक कोंडी, अपघात, महापालिका शाळांची बिकट स्थिती, रुग्णालये व दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा अभाव, कचरा व्यवस्थापन व डास निर्मूलनातील अपयश या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.
१४ हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त चार हजार कर्मचाऱ्यांवर कारभार सुरू असल्याने जनतेला सेवा देण्यात महापालिका अपयशी ठरल्याची टीका करण्यात आली. उत्तर प्रदेशात प्रयागराज कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये दिले जातात, पण नाशिकसाठी कर्ज काढा असे सांगितले जाते. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेऊनही शहराची बिकट अवस्था कशी झाली, असा प्रश्न नेत्यांनी उपस्थित केला.
महावितरणच्या सक्तीच्या स्मार्ट मीटर मोहिमेविरोधात बैठकीत निषेध नोंदवण्यात आला. मोर्चाच्या पूर्वतयारीत शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असून, या स्वाक्षरी मोर्चाच्या दिवशी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना देण्यात येणार आहेत. बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. डी.एल. कराड, ॲड. तानाजी जायभावे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव राजू देसले, मनोहर पगारे, आदी उपस्थित होते. बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागांत उमेदवार उभे करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.