दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : उसाची एफआरपी प्रमाणे देयके देण्याची मारामार, तर काही ठिकाणी त्याहून कमी देयके देऊनही सत्ताधाऱ्यांनाही साखर कारखाना निवडणुकीत सत्ता राखलेली. अशी साखर कारखानदारीत अनेक ठिकाणी दिसत असताना दूधगंगा वेदगंगा ( बिद्री ) या राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवण्यासाठी झुंजावे लागत असल्याचे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना कारभारावरून आरोप प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी ताकदीने प्रचार चालवला असल्याने निवडणुकीत आत्यंतिक चुरस निर्माण झाली आहे. महायुतीतील दोन मंत्री एकमेका विरोधात आहेत. दोन खासदार एका बाजूला तर पाच माजी आमदार दुसरीकडे आहेत. एक आमदार सत्तेच्या बाजूने तर दुसरा विरोधात अशी बलदंड राजकीय ताकद लागलेल्या आणि चार तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहाराला उधाण आले आहे.

हेही वाचा… विकासकामातील हस्तक्षेपाचा नगरमध्ये राजकीय गदारोळ

कोल्हापूर जिल्ह्यात राजाराम,गडहिंग्लज, कुंभी, भोगावती आदी साखर कारखान्याच्या निवडणुका इर्षेने लढल्या गेल्या. सत्तासूत्रे सत्ताधारी गटाकडे कायम राहिली. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी सत्ता राखणार का की विरोधक आपला झेंडा रोवणार याला कमालीचे महत्त्व आले आहे. बिद्री कारखान्यात गेली दोन दशके राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष,काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. त्यांनी चांगला साखर उतारा असलेल्या बिद्री कारखान्याची उसाला राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी उजळ प्रतिमा करताना गाळप विस्तारीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मिती याद्वारे उत्पन्नाचे भरीव पर्याय तयार केले आहे.

गेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी भाजप, जनता दल यांना सोबत घेतले होते. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही प्रचारात उतरले होते. आता राजकीय चित्र पूर्णतः बदललेले आहे. यावेळी विरोधकांच्या छावणीमध्ये महायुतीचे नेते एकत्रित आले आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यांच्यासोबत संजय मंडलिक व धनंजय महाडिक हे दोन खासदार, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक हे प्रमुख नेते आहेत. मुख्य म्हणजे के. पी. पाटील यांचे मेहुणे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय . पाटील यांनी विरोधकांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याने विरोधकांची बाजू आणखी बळकट झाली आहे. ए. वाय. पाटील हे विरोधकांकडे गेले असले तरी त्यांचे समर्थक सोबत असल्याने त्याचा सत्तारूढ गटावर कोणताही परिणाम होणार नाही. १० हजाराच्या मताधिक्याने सत्ताधारी महालक्ष्मी आघाडी पुन्हा विजय मिळेल, असा विश्वास सत्तारूढआघाडीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा… स्थानिक स्वराज्य संस्थांतील ‘माधव’चे प्रतिनिधीत्व घटणार

आजी- माजी पालकमंत्र्यांवर मदार

विरोधकांनी बिद्रीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावले आहे. सह वीज निर्मिती प्रकल्पामध्ये के. पी. पाटील यांनी ९० कोटीचा गैरव्यवहार केला आहे. त्यांचा कारखान्यामध्ये हुकूमशाही कारभार सुरू आहे. ते पुन्हा सत्तेत आले तर कारखान्याचे नुकसान होईल ,असा मुद्दा विरोधकांकडून हिरीरीने मांडला जात आहे. विरोधी गटाचे नेते हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री सतेज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यासह दिनकरराव जाधव, संजय घाटगे, बजरंग देसाई या माजी आमदारांनी सत्ताधारी गटाची भरीव कामगिरी ठणकावून सांगतानाच विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. बिद्री कारखाना म्हणजे के. पी. पाटील यांची खाजगी मालमत्ता नव्हेअसे म्हणत माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीकेचा भडीमार करीत सत्ता विरोधकांची येणार याचा दावा करीत आहेत. तर, कारखान्याच्या विशेष लेखा परीक्षणाच्या चौकशीतून के. पी. पाटील यांना बाजूला काढणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे पुन्हा त्यांच्याकडे सत्ता सोपवण्यासाठी रणनीती आखत आहेत. परिणामी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत आजी- माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मोपलवार राजकारणात ?

विधानसभेची तयारी

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीला आगामी विधानसभा निवडणुकीची किनार आहे. प्रकाश आबिटकर हे पुन्हा शिंदेसेनेकडून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे के. पी. पाटील हे सामना करणार हे जवळपास निश्चित आहे. कागलमधील हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे यांच्यातील महायुती अंतर्गत मैत्रीपूर्ण लढती प्रमाणेच राधानगरीत सद्धा मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे. प्रचाराच्या ओघात मुश्रीफ आणि घाटगे या दोन साखर कारखान्याच्या नेत्यांचा शाब्दिक खडाजंगी चर्चेत आहे. बिद्री कारखाना कमकुवत करून तेथील ऊस मुश्रीफ यांना त्यांच्या सरसेनापती घोरपडे कारखान्याकडे न्यायचा आहे. गडहिंग्लज साखर कारखान्या प्रमाणेच बिद्री कारखाना ब्रिक्स कंपनीच्या ताब्यात देण्याचा मुश्रीफ यांचा डाव आहे, असा आरोप घाटगे यांनी केला आहे. तर त्याला जशास तसे उत्तर देत मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर टोकदार टीका चालवली आहे. यामुळे साखर कारखाना निवडणुकीच्या बरोबरच आतापासूनच विधानसभेचे रणही तापू लागले आहे. किंबहुना साखरपेरणी करता करता विधीमंडळात पोहण्याच्या दिशेने कूच सुरु ठेवली असल्याचे मतदार सभासद शेतकरी आणि जनतेच्याही नजरेतून सुटलेले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics is in full swing between chandrakant patil and hasan mushrif over shree dudhganga vedganga sahakari sakhar karkhana ltd election print politics news asj
First published on: 30-11-2023 at 12:22 IST