लॉकडाउन सगळ्या व्यवसायांवरर परिणाम झाला आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मार्केटचं विकेंद्रीकरण करायचं आहे असं पुण्यातल्या व्यापाऱ्यांच्या मनात आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यापारी महासंघाच्या मनात व्यापारविषयक कायम स्वरुपी प्रदर्शन असावं असं आहे असंही पवार यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातली बाजारपेठ बंद केलं आहे. राज्य सरकारने काही दुकानं आणि व्यवसाय सुरु करण्याची संमती दिली आहे. तरीही ग्राहकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे हवा तसा प्रतिसाद दिसत नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे. सरकारने जी बंधनं घालून देईल ती बंधनं घालून घेत व्यापार करण्याची आमची तयारी आहे असंही व्यापारी महासंघाने सांगितल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आजच व्यापारी संघाच्या सदस्यांसोबत त्यांची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते.

करोनाचं संकट मानवी समाजाला अस्वस्थ करणारं आणि चिंताजनक असं संकट आहे. या संकटाचं गांभीर्य आम्ही ओळखलं आहे. जी खबरदारी घ्यायची असेल ती आम्ही घेऊ मात्र व्यापारासाठीची संमती द्या असं व्यापारी संघाने सांगितलं आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सध्या जो फटका व्यापार आणि उद्योगांना बसला आहे त्यातून सावरण्यासाठी सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मदत करावी असंही आवाहन शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या प्रश्नांबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु असते. त्यांचं काम समाधानकारक आहे. तसंच राज्यावर करोनाचं संकट जेव्हापासून आलं आहे तेव्हापासून मुख्यमंत्री हे चांगलं काम करत आहेत. महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर किंवा अस्वस्थता नाही. विरोधकांनी अशा संकट काळात टीका-टिपण्णी करु नये असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच चंद्रकांत पाटील यांनी काय भाष्य केलं त्यावर मला भाष्य करावंसं वाटत नाही असंही शरद पवार म्हणाले.