पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी नुकतीच जाहीर केली. त्यासह राज्यभरात ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश जाहीर (ॲलोकेशन) झालेल्या १४७ कनिष्ठ महाविद्यालयांची यादीही जाहीर करण्यात आली असून, त्यात मराठी, इंग्रजीसह उर्दू माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.
यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया पहिल्यांदाच राज्यभर ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे पहिली निवडयादी जाहीर करण्यास विलंब झाला. मात्र, गुरुवारी निवडयादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी ७ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या यादीसह क्षमतेच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश जाहीर केलेल्या १४७ कनिष्ठ महाविद्यालयांची यादी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने तयार केली आहे.
या यादीत मुंबई, पुणे, लातूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, रायगड, नंदूरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, बीड, सांगली, यवतमाळ अशा ठिकाणच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने मराठी, इंग्रजी माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. मात्र, त्यात उर्दू माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्याही लक्षणीय आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर म्हणाले, ‘प्रवेशक्षमतेच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश १४७ महाविद्यालयांमध्ये जाहीर करण्यात आले आहेत. यात महाविद्यालयांच्या यादीत इंग्रजी, मराठी, कन्नड, उर्दू माध्यमाची कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
उर्दू माध्यमाची कनिष्ठ महाविद्यालये बहुतांश ग्रामीण भागात आहेत. तेथे उपलब्ध असलेल्या जागाही कमी आहेत. दहावीपर्यंत इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा त्याच माध्यमाकडे असल्याने त्या महाविद्यालयातील उपलब्ध जागांवर ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश जाहीर झाले आहेत.’