पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस उपायुक्तांच्या कामकाजात फेरबदल करण्यात आले. डॉ. शिवाजी पवार यांच्याकडे गुन्हे शाखा, बापू बांगर यांच्याकडे परिमंडळ दोन, तर विवेक पाटील यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश काढले. पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त संदीप डोईफोडे यांची मीरा भाईंदर येथे आणि स्वप्ना गोरे यांची पुणे राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक दोनच्या समादेशकपदी बदली झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलात नागपूर येथील श्वेता खेडकर आणि छत्रपती संभाजीनगरचे संदीप आटोळे यांची उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चौबे यांनी तीन पोलीस उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत.
परिमंडळ तीनची जबाबदारी असलेल्या डॉ. शिवाजी पवार यांच्याकडे गुन्हे आणि अतिरिक्त कार्य विशेष शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. बापू बांगर यांची वाहतूक शाखेतून परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. मुख्यालयात असलेले विवेक पाटील यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.