पुणे : कोंढव्यात छच्याच्या बंदुकीचा धाक दाखवून एका उपाहारगृहात काम करणाऱ्या शेफला लुटणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली.तबरेज उर्फ परवेज मुनीर शेख (वय २२, रा. जे. के. पार्क, काेंढवा), रमजान अब्बास पटेल (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुण मूळचा बिहारमधील आहे. तो सध्या कोंढव्यात वास्तव्यास आहे. तो कोंढव्यातील एका उपाहारगृहात शेफ आहे. एनआयबीएम रस्त्यावर उपाहारगृह असून, उपाहारगृहात काम सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात चालते. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी चारच्या सुमारास तो कामावर निघाला होता. एनआयबीएम रस्त्यावरील मौर्य हाऊसिंग सोसायटीसमोरुन तो निघाला होता. त्या वेळी आरोपी तबरेज अणि त्याचा साथीदार रमजान दुचाकीवरुन तेथे आले. दोघांनी तरुणाला बंदुकीचा धाक दाखविला. त्याच्या डोक्याला बंदूक लावली. तक्रारदार तरुणाने दोघांना प्रतिकार केला. चोरटा आणि तरुणात झटापट झाली. झटापटीत त्याने चोरट्यांकडील बंदूक हिसकावून घेतली. झटापटीत तरुणाचा शर्ट फाटला. चोरट्यांनी त्याचा मोबाइल संच हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर तरुण घरी गेला. त्याने उपाहारृहातील वरिष्ठ शेफला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याबाबतची माहिती कळविण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तरुणाची चौकशी केली. चौकशीत तरुणाला धमकाविण्यासाठी छऱ्याची बंदूक वापरल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पसार झालेले चोरटे परवेज आणि रमजान यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी ‘काॅप २४’ योजना

पादचाऱ्यांना लुटणे, तसेच रस्त्यावरील गंभीर गुन्हे (स्ट्रीट क्राइम) रोखण्यासाठी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. गुन्हा घडल्यानंतर त्वरित मदत आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण तयार करण्यासाठी उद्देशातून पुणे पोलिसांकडून कॉन्स्टेबल ऑन पेट्रोलिंग म्हणजेच ‘कॉप -२४’ योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ेत शनिवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. विशेष पथकात ७२६ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकातील पोलीस कर्मचारी अहोरात्र गस्त घालणार आहेत. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात गस्त घालण्यासाठी स्वतंत्र पाेलीस कर्मचाऱ्यांची (बीट मार्शल) नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण पुणे शहर, उपनगरात परिणामकारक गस्त घालण्यासाठी एकच केंद्रित व्यवस्था तयार करण्याच्या विचारातून ‘काॅप-२४’ योजना योजना सुरू करण्यात आली आहे.