रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल १८ वर्षानंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये विजय मिळवला आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मंगळवारी रात्री अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. २००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाल्यापासून विराट कोहली बंगळुरूकडून खेळत आहे. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या बंगळुरूला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, यंदा त्यांनी दमदार कामगिरी करत पहिल्या जेतेपदाला अखेर गवसणी घातली आहे.
रॉयल चॅलेंजर्सच्या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू आहे. सोशल मीडियावर या विजयानंतर भावूक झालेला विराट कोहली, पत्नी अनुष्काबरोबरचा भावूक क्षण, रॉयल चॅलेंजर्स संघाने ट्रॉफी उचलताना क्षण, विजयनंतर आनंदाने नाचनाचा क्षण…दाखवणारे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून त्यांचा पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली, ज्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. बंगळुरूमध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी इतका जल्लोष केला ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
पुण्यातही आरसीबीच्या आरसीबीच्या चाहत्यांनी एफसी रस्त्यावर उतरून विजयाचा जल्लोष केला. कोणी फटका फोडले, कोणी आयपीएल ट्रॉफी सारखी दिसणारी ट्रॉफी घेऊ फिरले, कोणी विराट कोहलीचे तर कोणी अनुष्का शर्माचे पोस्टर घेऊन नाचले. कोणी आरसीबीची जर्सी घेऊन नाचले. काही जण भररस्त्यात नाचत होते तर काहीजण बसवर चढून नाचत होते. एफीसी रोडवर चाहत्यांचा फक्त जल्लोष सुरू होता. सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद होता. सोशल मीडियावर जल्लोषाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना कोणी विराट कोहलीला उद्देशून चिकू भाऊ म्हटले तर अनुष्काला वहिणी असे म्हटले.
काल झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जने नानेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंगळुरूने विराट कोहलीच्या ४३ धावा आणि इतर फलंदाजांनी केलेल्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीच्या जोरावर १९० धावा केल्या होत्या. बंगळुरूच्या या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघ २० षटकांत १८४ धावाच करू शकला.