मुंबई : राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झाला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी होताच राज्यात काही भागात पावसाचा जोर ओसरला आहे. त्याचवेळी कोकण, घाटपरिसर आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणासह घाटपरिसर आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात सोमवारी हवेच्या कमी दाबाचे नवीन क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस घाट परिसर, मराठवाडा भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तापमानात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवारी रायगड, पुणे घाट परिसर या भागात मुसळधार पाऊस, तर पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड भागात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.