वर्धा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज शिराळा येथे भाषण केले. भाषणातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगलेच कौतुक केले. तसेच आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे असे वक्तव्य केले. यावरून देवेंद्र फडणवीस हेच पक्षाचे विश्वासू असल्याचा व त्यांनाच परत मुख्यमंत्री करण्याचा मानस असल्याचे तर्क आता व्यक्त होत आहेत.

आर्वीत भाजपचे अधिकृत उमेदवार सुमित वानखेडे यांच्या विरोधात अर्ज दाखल करीत बंडखोरी करणारे आमदार दादाराव केचे यांना समजविण्याचे सर्व प्रयत्न संपले. तेव्हा केचे यांना शहा यांच्याच पुढ्यात उभे करण्याचे ठरले. तेव्हाच काही मार्ग निघेल, असे सूर आमदार परिणय फुके यांनी संदीप काळे यांच्या घरी झालेल्या चर्चेत व्यक्त केले. लगेच तयारी झाली. आर्वी बाजार समितीचे अध्यक्ष असलेले संदीप दिलीप काळे यांना केचे यांनी सोबत घेतले. नागपुरातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सुधीर दिवे सोबत आले. हे चौघे मग अहमदाबादला तातडीने रवाना झाले.

आणखी वाचा-“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

तिथे थेट अमित शहा यांच्याकडे पोहचल्यावर केचे यांनी आपबिती सांगितली. शहा यांनी शांतपणे ऐकून घेतले व केचेंना म्हणाले, की तुमचा योग्य तो सन्मान पक्षात राखला जाईल. पक्षाचे कार्य करा. अन्याय होणार नाही. तेव्हा बावनकुळे म्हणाले की आपण केचे यांना विधान परिषदेवर घेऊ शकतो. तसेच सध्या प्रदेश उपाध्यक्ष हे मोठे पद देता येईल. अमित शहा यांनी लागलीच देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि झालेले बोलणे फडणवीस यांच्या कानी टाकले. हे झाल्यावरच मग केचे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, अशी माहिती या बैठकीत उपस्थित एकाने दिली.

आणखी वाचा-“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज अमित शहा यांनी फडणवीस यांचा केलेला विशेष उल्लेख व अहमदाबाद येथे झालेल्या बैठकीतील शहा – फडणवीस संवाद याचा असं संबंध जोडला जात आहे. महाराष्ट्रात फडणवीस हेच वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू व पुढील दावेदार असे चित्र उमटत असल्याचे यातून दिसून येते, अशी भाजप वर्तुळत चर्चा सुरू झाली. केचे यांनी वर्ध्यात परतल्यावर आपली भूमिका मांडतांना पक्षाने आपल्याला सर्वोच्च विश्वास दिल्याची भावना मांडली. न्याय नक्की मिळणार, असे त्यांनी हसत सांगितले आणि हाच विश्वास बाळगून ते फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांच्या प्रचारात गुंतल्याचे दिसून येते.