भंडारा : शहरात नव्या निर्माणाधीन बाह्य वळण (बायपास) महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला. रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या पावसामुळे दुचाकी घसरल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तिने उभ्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

दुचाकीस्वार हे नागपूरकडून साकोलीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरून भरधाव निघाले होते. महामार्गाचं काम सुरू असल्याने कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक तिथे उभा होता. पावसामुळे चालकाचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले, दुचाकीस्वार आधी बॅरिकेटला धडकून ट्रकवर आदळले. या अपघातात सोनू पांडुरंग पालवे (२३) आणि मृणाल दत्तात्रय मानवटकर (२५) या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला .

भंडारा पोलिसांनी अपघातास कारणीभूत कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था आणि काम सुरू असताना घेतली जाणारी काळजी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गाचे काम सुरू असल्याने त्या भागात सावधगिरी बाळगणे आवश्यक होते. मात्र, कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उभ्या ट्रकभोवती आवश्यक त्या सूचनाफलकांचा, दिव्यांचा आणि प्रतिबंधक चिन्हांचा अभाव होता. त्यामुळेच अंधार आणि पावसामुळे रस्ता स्पष्ट दिसला नसल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. भंडारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.