महाराष्ट्र विद्यार्थी सेनेतर्फे राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र शाखा स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे सामूहिक आणि वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज दिली. सध्या ते पुणे दौऱ्यावर असून विद्यार्थी आणि युवक यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

‘लोकसत्ता’शी बोलताना ते म्हणाले, की सध्या आपण राज्यभर दौरा करत असून, यापूर्वी झालेल्या मुंबई, कोकण, ठाणे, पालघर आणि नाशिक येथील दौऱ्यात मिळालेला युवकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. पुण्यानंतर मराठवाडा आणि विदर्भाचा प्रत्येका दहा दिवसांचा दौरा करणार असून उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रचा दौराही गणेशोत्सवानंतर करण्याचे ठरवले आहे.

पौगंडावस्थेत येत असलेल्या तरुणाईचे सार्वजनिक आणि वैयक्तिक असे दोन्ही प्रकारचे प्रश्न असतात. काही ठिकाणी महाविद्यालयातील रँगिंग, साफसफाई, मुलींची छेडछाड यासारखे प्रश्न असतात, तर आरक्षण, शिक्षण पूर्ण केल्यानंतरचा रोजगार, स्पर्धा परीक्षा यासारखे सार्वजनिक प्रश्नही सतत भेडसावत असतात. संपूर्ण राज्याचा दौरा केल्यानंतर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणाऱ्या शाखेमार्फत राज्य पातळीवर आंदोलन करण्यात येईल.

अमित ठाकरे म्हणाले, की कोकणातील दौऱ्यात भर पावसातही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सेनेत सक्रीय सहभाग घेण्यासाठी दाखवलेला उत्साह आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असाच प्रतिसाद राज्यभर मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा करण्यापेक्षा आपणच त्यांना मदत करायला हवी, असा आपला दृष्टिकोन असून, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.