बदलापूरः भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ज्या जिजाऊ संघटनेच्या मतविभाजनामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्या जिजाऊ संघटनेने मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मुरबाड विधानसभेत लोकसभा निवडणुकीवेळी निलेश सांबरे यांना तब्बल ६४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे ही मते आता कथोरेंच्या बाजूने वळण्याची आशा आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवाचे गणित वेगवेगळ्या प्रकारे मांडले जात असले तरी या मतदारसंघात जिजाऊ संघटनेच्या सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी तब्बल २ लाख ३१ हजार मते मिळवली. यात भिवंडी ग्रामीण या विधानसभेत तब्बल ६२ हजार ८५७ तर शहापूर विधानसभेत ७४ हजार ६८९ इतकी मते सांबरे यांना मिळाली. शहापुरात सर्वाधिक मते सांबरे यांना मिळाली होती. त्याचवेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघात सांबरे यांना ६४ हजार ७१३ मते मिळाली. ही मते कुणबी समाजाची असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कपिल पाटील यांचे मताधिक्य काही अंशी कमी झाल्याची चर्चा होती. जिजाऊ संघटनेने जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले असले तरी मुरबाड मतदारसंघात भूमिका स्पष्ट नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या एका बैठकीत जिजाऊ संघटनेने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजप उमेदवार किसन कथोरे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. मुरबाडमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत जिजाऊ संघटनेने किसन कथोरे यांना विधानसभेसाठी पाठिंबा जाहीर केला. तर कल्याण तालुक्यातील निंबवली गावात प्रचारानिमित्त असलेल्या किसन कथोरे यांची निलेश सांबरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कथोरे यांना शुभेच्छा दिल्या. या पाठिंब्यामुळे मुरबाड मतदारसंघातील जिजाऊच्या मतांची कथोरेंच्या मतात भर पडते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहापुरात जिजाऊला फायदा ?

आमदार किसन कथोरे यांची मुरबाड तालुक्यासह कल्याण, शहापूर, अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातही ताकद आहे. सांबरे यांनी कथोरे यांना मुरबाडमध्ये पाठिंबा दिल्यानंतर शहापूर मतदारसंघात सांबरे यांनाही मदत होईल का अशी चर्चा आता रंगू लागली आहे. शहापुरात जिजाऊ संघटनेच्या उमेदवाराला लोकसभेचा मतांचा फायदा होण्याची चर्चा येथे आहे.  येथे विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे पांडूरंग बरोरा हे पारंपरिक प्रतिस्पर्धीही रिंगणात आहेत. कथोरेंना पाठिंबा देण्याच्या खेळीमुळे शहापुरात सांबरेंनी राजकीय जुळवाजुळव केल्याचेही बोलले जाते.