कल्याण – कल्याण मुरबाड रस्त्यावर मामणोली जवळील हिंदू सेवा संघ भागात बुधवारी सकाळी काँक्रीट रस्त्यासाठी खोदलेल्या चिखल मिश्रित राडारोड्यावर घसरून एक दुचाकी स्वार रस्त्यावर पडला. त्याचवेळी पाठीमागून वेगात असलेला एक डम्पर या तरूणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

रोहन राजेंद्र मलाह (२०) असे मृत तरूणाचे नाव आहे. कल्याण मुरबाड रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. हे काम म्हारळ कांबा पाचवा मैल भागातून ते मुरबाडच्या दिशेने सुरू आहे. या रस्ते कामासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी चिखल मिश्रित पाणी, राडारोड्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यावरून वाहने धावत आहेत.

उन्हाळ्यात या रस्त्यावर खोदकाम आणि राडरोड्यामुळे धूळ उडत होती. पाऊस सुरू झाल्यापासून रस्त्यावर खोदकामाच्या ठिकाणी पाणी तुंंबले आहे. रस्त्याच्या एक कडेला राडारोडा, मातीचे ढीग आहेत. पावसाचे पाणी या राडारोडा, ढिगांवरून रस्त्यावर पसरत आहे. मोटार, दुचाकी स्वार या रस्त्यावर वेगात असला की त्या वाहनाचे टायर या माती मिश्रित चिखलात जागीच फिरतात. दुचाकीचे टायर जागीच फिरू लागतात. त्यामुळे दुचाकी स्वाराला आपला तोल सांभाळणे कठीण होते. अशा अवघड परिस्थितीत दुचाकी स्वार दुचाकीसह घसरून रस्त्यावर पडतो, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

भांडुप येथे राहणारा रोहन मलाह हा कल्याण मुरबाड रस्त्यावरून बुधवारी सकाळी दुचाकीवरून जात होता. मामणोली भागातील हिंदू सेवा संघ भागातून तो जात असताना रस्त्यावर पसरलेल्या राडारोड्यावरील चिखलात त्याची दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी भरधाव वेगात असलेला त्याच्या पाठीमागून येणारा डम्पर रोहनच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.

कल्याण, मुंबई, ठाणे, मुरबाड परिसरातील बहुतांशी नोकरदार या काँक्रीट रस्त्यावरून दुचाकी, खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यांना चिखल मिश्रित राडारोड्याचा दररोज त्रास सहन करावा लागतो. हा राडारोडा रस्त्याच्या एका बाजुला करावा म्हणून स्थानिकांनी अनेकदा ठेकेदाराकडे तक्रारी केल्या आहेत पण त्याठिकाणी कोणीही ऐकून घेत नाही, असे रहिवाशांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कल्याण मुरबाड रस्त्याचे काम पावसाळा झाल्याने योग्यरितीने करण्याच्या सूचना स्थानिक खासदार, आमदार यांनी करणे आवश्यक आहे. या कामाकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे ठेकेदार मनमानी करत कामे करत आहेत. कामाच्या ठिकाणी ठेकेदार कंपनी, त्यांचा पत्ता, पर्यवेक्षक अधिकाऱ्याचे नाव, त्यांचा मोबाईल अशी कोणतीही माहिती कामाच्या ठिकाणी लावण्यात येत नाही. अपघात झाला की स्थानिक कामगार आपणास कंपनीचे नाव, ठेकेदार माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण मुरबाड रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम दोन वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याच्या मध्यभागी, कडेला पावसामुळे चिखल साचला आहे. हा चिखल पाऊस सुरू झाला की रस्त्यावर येतो आणि त्यावर दुचाकी स्वार, इतर वाहन चालक घसरून जीव गमावत आहेत. याप्रकरणाला ठेकेदार जबाबदार आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून मृताच्या कुटुंबीयांना भरपाई ठेकेदार कंपनीने द्यावी. – रवींद्र चंदने, अध्यक्ष, आरपीआय सेक्युलर, ठाणे जिल्हा.