केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे राज्यातले संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (२२ ऑगस्ट) केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ सध्या जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करून राज्यातील जनतेला महत्त्वाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी म्हटलं की कांदा उत्पादकांचं हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. २,४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी केली जाईल.

धनंजय मुंडे हे पियुष गोयल यांना भेटण्यापूर्वीच जपानमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून बातचीत केली. तसेच पियुष गोयल यांनाही फोन करून याप्रकरणी काय तोडगा काढता येईल याबाबत चर्चा केली. त्यापाठोपाठ फडणवीस यांनी ट्वीट करून कांदा प्रश्नावर केंद्र सरकार काय काय करतंय याबाबत माहिती दिली. त्यामुळे कांदा प्रश्नावर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी श्रेयवादाच्या लढाईबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे पियुष गोयल यांना भेटले, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली तर यात तुमची अडचण काय? दोघेही सरकारमधील घटक आहेत. ही श्रेयवादाची लढाई अजिबात नाही. आम्ही या असल्या लढाईत नाही. आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. शेतकऱ्याकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत.

हे ही वाचा >> “जखम डोक्याला अन्…”, ‘कांदा’ प्रश्नावरून आमदार रोहित पवारांचा देवेंद्र फडणविसांना टोला

यावेळी अजित पवारांच्या शेजारी बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ते श्रेयवादवाले घरी बसले आहेत”. मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, कांदा प्रश्नावर आमचे (महायुतीचे) एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on onion issue in maharashtra credit battle between bjp and ncp asc
First published on: 22-08-2023 at 15:40 IST