पिंपरी- चिंचवड: जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर भरधाव सीएनजी कारने पेट घेतला. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडगाव फाटा या ठिकाणी घडली आहे. कारने पेट घेतल्यानंतर दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली होती. काही मिनिटात घटनेमध्ये चारचाकी गाडी जळून खाक झाली आहे.
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वडगाव फाटा या ठिकाणी भरधाव सीएनजी कारने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत दोन्ही प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
वडगाव वरून पुण्याच्या दिशेने जात असताना अचानक कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव, वडगाव येथील अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले, काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं.
सुदैवाने या घटनेमध्ये कुणीही जखमी झालं नाही. घटने दरम्यान पुण्याहून मुंबईच्या आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली होती. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक हळूहळू पुरवत आली. रियाज मुलानी, धीरज शिंदे, ताहीर मोमीन या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती.वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनीही बचावकार्य केलं.