मुंबई : संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईतही शनिवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर आज मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर राज्यातील उर्वरित भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी मोसमी पाऊस दाखल झाला. मुंबई शहर तसेच उपनगरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर आजही कायम राहणार असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर राज्यातील उर्वरित भागात देखील आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कमी दाब क्षेत्र

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, तसेच पूर्व पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचाच प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या हवामान प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव कोकणात होणार असून पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

२४ तासांत २४४.७ मिमी पाऊस

सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० या २४ तासांत २४४.७ मिमी पावसाची नोंद झाली. याआधी ऑगस्ट २०२० मध्ये २६८.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी शनिवारी २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.

राज्यातील इतर भागातील स्थिती

कोकणात मुसळधार

कोकणात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मांजरा धरणाचे दरवाजे उघडले

मांजरा धरणातील दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडून ३४९४.२८ क्यूसेक्स इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पुढील पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोयनेच्या पात्रात विसर्ग

धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून २१०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे

अतिमुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट)

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ.

मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस (येलो अलर्ट)

जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम.

हलक्या सरी

सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव अहिल्या नगर, धुळे, नंदुरबार.