मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असताना, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरीत भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने उघडित दिली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई शहर तसेच उपनगरांतही सोमवारपासून पाऊस पडत आहे. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे तसेच बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या वाऱ्यांच्या चक्राकार स्थितीमुळे परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. याचबरोबर मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत सर्वत्र मुसळधार
राज्यात सोमवारी सकाळी ८:३० ते मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुरुड येथे १०८ मिमी, म्हसळा ८० मिमी, सोनपेठ १७५ मिमी, कुडाळ १०४ मिमी, सावंतवाडी ९८ मिमी, राजापूर ६६ मिमी, गुहागर ७४ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस सोयाबीन, तूर, मुग, उडीद आणि हळदीच्या पिकांसाठी उपयुक्त आहे.
मुंबईतही मुसळधार
मागील दोन दिवसांपासून मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर सर्वाधिक आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने असह्य उकाडा मुंबईकरांना सहन करावा लागत होता. पावसाच्या पुनरागमनामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी २७.६ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
कुठे पावसाचा अंदाज?
अति मुसळधार : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर
मुसळधार : मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर
विजा, मेघगर्जनेसह पाऊस : धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ