मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मोसमी पाऊस विदर्भासह देशातील आणखी काही भाग व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यात दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असून शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मोसमी वाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागातच आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत मोसमी वारे विदर्भातील काही भागात प्रगती करतील. तसेच छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागातही मोसमी वारे वाटचाल करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानुसार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला शुक्रवारी, शनिवारी दोन्ही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित भागात गडगडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी काही भागात जोरदार वारे वाहतील. राज्यात पावसाचा जोर रविवारपर्यंत राहील. त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावासाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार, पहिल्या आठवड्यात (१३ ते १९ जून) दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणात तसेच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात (२० ते २६ जून) उत्तर मध्य महाराष्ट्र व कोकणात तसेच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तिसऱ्या आठवड्यात (२७ जून ते ३ जुलै) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर चौथ्या आठवड्यातही (४ ते १० जुलै) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल विदर्भात मात्र या कालावधीत सरासरीइतक्या किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.