मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. शहर, तसेच उपनगरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यानंतर शनिवारीही पावसाचा जोर कायम होता. सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० दरम्यानच्या २४ तासांत २४४.७ मिमी पावसाची नोंद झाली. याआधी ऑगस्ट २०२० मध्ये २६८.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी शनिवारी २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात रविवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर राज्यातील उर्वरित भागातही अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईतही शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. शहर तसेच उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या सखलभागात शनिवारी सकाळीच पाणी साचण्यास सुरुवात झाली. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), तसेच चेंबूर, कुर्ला स्थानकात पाणी साचले होते.

मुसळधार पावसामुळे गोविंदा पथकांना मार्गस्थ होताना अडचणी येत होत्या. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० दरम्यानच्या २४ तासांत २४४.७ मिमी पावसाची नोंद झाली. याआधी ऑगस्ट २०२० मध्ये सांताक्रूझ येथे २६८.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी शनिवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

शहर, तसेच उपनगरात दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अनेक भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत भायखळा येथे १०२.५ मिमी, कुलाबा ३६.८ मिमी, चेंबूर ३३.५ मिमी, महालक्ष्मी ३१ मिमी, विक्रोळी २०.५ मिमी, शीव १७.५ मिमी, वांद्रे १५ मिमी, सांताक्रूझ १४.३ आणि जुहू येथे १२.५ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्र येथे ३८.६ मिमी, तर सांताक्रूझ येथे १९.८ मिमी पावसाची नोंद झाली. गेले अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने मुंबईत असह्य उकाडा सहन करावा लागत होता. मात्र, शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर हंगामातील म्हणजेच १ जून ते १६ ऑगस्टदरम्यान कुलाबा येथे १२०२.४ मिमी, तर सांताक्रूझ येथे १६८०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, तसेच पूर्व पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचाच प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या हवामान प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव कोकणात होणार असून पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात रविवारी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

इतर भागातील स्थिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.