मुंबई – संपूर्ण मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरीता कंत्राटदारांकडून वाहने आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला असून त्याकरीता मागवलेल्या निविदांना पालिकेतील सर्व कामगार संघटनांनी विरोध केला आहे. मुंबई महापालिकेने या निविदेला मुदतवाढ दिल्यामुळे कामगार संघटनानी पुकारलेला संप तात्पुरता स्थगित केला असला तरी मंगळवारी झालेल्या कामगारांच्या मेळाव्यानंतरही कामगार संपावर ठाम आहेत.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामगारांशी संवाद साधून मन वळवण्याचा यावेळी प्रयत्न केला. मात्र कंत्राट रद्द न केल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. त्यामुळे संप करावा की नाही याबाबत येत्या ८ जुलैला निवडणूक होणार आहे.
मुंबई महापालिकेने कचऱ्याच्या गाड्यांसदर्भात नवीन कंत्राट देण्याचे ठरवले आहे. घरोघरी गोळा केलेला कचरा गोळा करण्यासाठी सेवाधारित कंत्राट देण्याचे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने ठरवले आहे. आतापर्यंत कचरा गोळा करण्यासाठी काही ठिकाणी महापालिकेची वाहने व महापालिकेचे कामगार होते. तर काही ठिकाणी कंत्राटदाराची वाहने आणि महापालिकेचे मोटर लोडर अशी पद्धत होती.
ही पद्धत मोडीत काढून मुंबईतील २५ विभागांपैकी २२ विभागांमध्ये कंत्राटदाराची वाहने आणि त्यांचेच मनुष्यबळ असे सेवा आधारित कंत्राट देण्यात येणार आहे. या योजनेला कामगार संघटनांचा विरोध असून सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष समिती स्थापन केली आहे.
८ जुलैला मतपत्रिकेवर निवडणूक
या निविदेवरून प्रशासन विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटला आहे. १ जुलै पासून संपावर जाण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला होता. मात्र प्रशासनाने या निविदेला मुदतवाढ दिल्यामुळे १ जुलैचा संप टळला असला तरी पुढील दिशा ठरवण्यासाठी कामगारांनी मंगळवारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानंतरही कामगार हे संपावर ठाम आहेत.
त्यामुळे संप करायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी ८ जुलै रोजी रितसर निवडणूक होणार असल्याची माहिती कामगार नेते रमाकांत बने यांनी दिली. त्यानंतर ९ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा नेण्यात येणार असून त्यावेळी संपाचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे बने यांनी सांगितले.
पालिका आयुक्तांची मेळाव्याला हजेरी
भायखळ्याच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कामगारांच्या मेळाव्याला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील हजेरी लावली होती. गगराणी यांनी यावेळी व्यासपीठावरून कामगारांशी भावनिक संवाद साधला. मुंबई महापालिकेचे सफाई कामगार उत्तम काम करतात पण काळानुरुप मुंबईतील सफाई कामगारांसमोरील आव्हाने बदलली आहेत.
कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अत्याधुनिक पद्धतीने सफाई करण्याची आवश्यकता असून त्याकरीता हे कंत्राट दिले जाणार आहे. यात कोणत्याही कामगाराची नोकरी जाणार नाही, कोणाच्या हक्कांवर गदा येणार नाही, असे आश्वासन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.